अब्दुल सोगावकर
सोगाव : अलिबाग तालुक्यातील चोंढी येथील रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची रोटरी क्लब ऑफ सिशोर, आय. ए. पी. रायगड, ए. एच. ए. रायगड व ग्रुप ग्रामपंचायत किहीम यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि. १२ नोव्हेंबर २०२५ रोजी मोफत आरोग्य तपासणी करून औषधोपचारासह मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांची वजन, उंची, ऑक्सिजन लेव्हल, रक्तगट, बी. एम. आय. इंडेक्स व इतर तपासण्या करून एकूण ७० विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी केली. यामध्ये शारीरिक क्षमता कमी असलेल्या गरजू विद्यार्थ्यांना औषधोपचारासह आहार व काळजी याविषयी अनमोल असे मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये औषधोपचार करण्यात आलेल्या सर्व विद्यार्थ्यांची ६ महिन्यांनी पुन्हा तपासणी करण्यात येणार असल्याचे उपस्थित डॉक्टरांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी पौष्टिक आहार म्हणून किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांनी दर आठवड्याला दूध, अंडी व सफरचंद देणार असल्याचे यावेळी शिबिरात मनोगत व्यक्त करताना त्यांनी सांगितले.
या आरोग्य तपासणी शिबिरात रोटरी क्लब ऑफ सिशोरचे अध्यक्ष रोटरीअन अंकुश पाटील, आय. टी. डायरेक्टर निलेश म्हात्रे, रोटरीअन जनार्दन चापडे, खजिनदार रोटरीअन तन्वी शेट्ये, प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. राजेंद्र चांदोरकर, जिल्हा रुग्णालय अलिबाग रक्तपेढी प्रमुख डॉ. दिपक गोसावी, किहीम सरपंच प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड, केंद्रप्रमुख नितीन पाटील सर, मुख्याध्यापिका विद्या पेढवी, शिक्षक नितीन वाकडे, चेतन कोळी, किहीम आदिवासी वाडी राजिप शाळेच्या शिक्षिका सुप्रिया महाले व इतर मान्यवर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचे व विद्यार्थ्यांची तपासणी करण्यासाठी उपस्थित डॉक्टरांचे किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांनी आभार मानले. तर शिबिराच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक नितीन वाकडे यांनी केले.
राजिप चोंढी शाळेतील विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी
