अमोल चांदोरकर
श्रीवर्धन : एकनाथ शिंदे हे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यापासून रायगड जिल्ह्यात व विशेष करून श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणावर बदलाचे वारे वाहत असल्याचे पहावयास मिळत आहेत. त्यातच पुन्हा एकदा भर पडली असून शिवसेना उपनेते महाड विधानसभेचे आमदार भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून श्रीवर्धन तालुक्यातील दांडगुरी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच गजानन पाटील तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विद्यमान युवासेना तालुका उप अधिकारी ओमकार शेलार यांनी लोणेरे येथे जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
श्रीवर्धन विधानसभा मतदार संघ आपण विकासकामांठी दत्तक घेतला असून मागील १५ वर्षाचा विकासकामांचा बॅकलॅाग आपण भरून काढण्याचा प्रयत्न करणार असल्याने विकासकामांसाठी श्रीवर्धन विधानसभा मतदार संघांतील गावेच्या गावे शिवसेनेत येत आहेत. येत्या काही दिवसात श्रीवर्धन, म्हसळा , तळा, रोहा तालुक्यातील अनेक गावे शिवसेनेत सामावून घेत वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचे आशीर्वादाने श्रीवर्धनवर पुन्हा भगवा डौलाने फडकविण्याचे काम आपण करणार असल्याचे आमदार गोगावले यांनी सांगितले.
श्रीवर्धन विधानसभा मतदार संघांतील घराणेशाही संपविण्यासाठी २०२४ ला जनता उत्सुक असल्याचे वातावरण दिसत असून आज देखील श्रीवर्धन, म्हसळा व तळा तालुक्यात टॅंकरने पाणी पुरवठा करावा लागत असल्याने मतदार संघासाठी हे दुर्देवच म्हणावं लागत आहे. यासाठी विशिष्ट समाजाला हाताशी घेऊन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या येथील प्रस्थापितांना गाडण्याचे आवाहन दक्षिण रायगडचे जिल्हाप्रमुख प्रमोदभाई घोसाळकर यांनी केले. त्याप्रसंगी महीला जिल्हा प्रमुख निलिमा घोसाळकर, श्रीवर्धन मतदार संपर्कप्रमुख सचिन पाटेकर, तालुका संपर्कप्रमुख सुरेश मिरगळ, तालुका संघटक रफिक जहागिरदार, ग्राहक संरक्षण अध्यक्ष प्रवीण दर्गे, मौजे जसवली गावचे ग्रामस्थ आणि शिवसेनेचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.