• Thu. Jun 26th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

थेरोंडा खंडोबा मंंदिरातील चांदीच्या मुर्तीवर डल्‍ला मारणाऱ्या आरोपीच्या रेवदंडा पोलिसांनी आवळल्या मुसक्या

ByEditor

Jun 1, 2023

अमूलकुमार जैन
अलिबाग :
अलिबाग तालुक्यातील रेवदंडा ग्रामपंचायत हद्दीतील मौजे थेरोंडा खंडेरावपाडयातील भरवस्तीत असलेल्या खंडोबा मंदिराच्या देव्हारातील पाच किलो तीनशे साठ ग्रॅम वजनाच्या चांदीच्या मुर्ती चोरट्यांनी १७ मे २०२३ रोजी रात्रीचे समयी चोरीस नेल्याप्रकरणी रेवदंडा पोलिस ठाणे येथे अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपीच्या रेवदंडा पोलिसांनी मुसक्या आवळून काही मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीस अलिबाग न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

थेरोंडा पाचपाडे कोळीवाड्याचे कुलदैवत असलेल्या खंडेरावपाड्यातील खंडोबा मंदिरात बुधवार, दि. १७ मे २०२३ रोजी रात्री पावणे आठ ते गुरूवार पहाटे साडे पाचचे दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करून गाभार्‍यातील एकूण ५ किलो ३६० ग्रॅम वजनाच्या चांदीच्या मुर्ती चोरीस नेल्या. पहाटे पुजाअर्चा करण्यास गेलेल्या ग्रामस्थांच्या निदर्शनास चोरीची घटना आली. त्यानंतर तात्काळ रेवदंडा पोलिस ठाण्यात घडलेल्या चोरीची घटना कळविण्यात आली.

थेरोंडा खंडेराव पाडा मंदिरात असलेल्या लाकडी देव्हाऱ्यात पन्नास वर्षापुर्वीच्या मल्हारी मार्तंड, म्हाळसा, भैरीदेवीच्या चांदीच्या मोठ्या मुर्ती व काळभैरव देवाच्या सहा मुर्ती अंदाजे ३ किलो १६० ग्रॅम वजनाच्या चांदीच्या व पाठीमागील बाजूस तांब्याच्या धातूचा मुलामा व चांदीचा लोलक असलेला तसेच मुंबईकर कुटूंबियाचे कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या व एकविरा देवीच्या चांदीच्या मुर्ती व पाठीमागील बाजूस तांब्याच्या धातूचा मुलामा व चांदीचा लोलक असलेला एकूण १ किलो २६० ग्रॅम वजनाच्या मुर्ती तसेच ढोलके कुटूंबियाच्या एकविरा, म्हाळसा, खंडोबा, भैरीदैवी यांच्या चांदीच्या व पाठीमागील बाजूस तांब्याच्या धातूचा मुलामा व चांदीचा लोलक असलेला एकूण ९४० ग्रॅम वजनाच्या मुर्ती असे एकूण ५ किलो ३६० ग्रॅम वजनाच्या चांदीच्या मुर्ती होत्या. या सर्व मुर्तीची चोरी अज्ञात चोरट्यांनी रात्रीचे समयी चोरीस नेल्याची तक्रार गोरखनाथ लक्ष्मण नवरीकर यांनी रेवदंडा पोलिस ठाणे येथे दिली होती.

थेरोंडा खंडेरावपाड्यात भव्य खंडोबा मंदिर आहे. या मंदिराचा जिर्णोध्दार सन २००८ मध्ये मुंबई महानगर पालिकेचे माजी नगरसेवक प्रकाश बोबडी यांचे प्रयत्नातून संपन्न झाला आहे. या मंदिरात पन्नास वर्षापुर्वीच्या चांदीच्या मुर्ती होत्या. नित्याप्रमाणे सकाळी खंडोबा मंदिरात ग्रामस्थ नेहमीप्रमाणे मंदिरात पुजाअर्चा करण्यासाठी गेले असता त्यांना मंदिरातील देव्हारात मुर्ती नसल्याचे आढळून आले. यावेळी तेथे परिसरातील ग्रामस्थ जमा झाले व तत्परतेने रेवदंडा पोलिसांना कळविण्यात आले होते. घटनास्थळी रेवदंडा पोलिस ठाण्याचे पोलीस निरिक्षक देवीदास मुपडे तात्काळ पोलिस कर्मचारी वर्गासह उपस्थित राहिले. चोरीच्या घटनेचे गांर्भिय व स्थानिक कोळी समाजाच्या भावना लक्षात घेऊन अलिबाग गुन्हे अन्वेषण विभागाचे पो. नि. दयानंद गावडे यांनी सुध्दा घटनास्थळी लागलीच धाव घेतली. लागलीच पोलिस तपास सुरू करण्यात आला. तेथील ग्रामस्थांचा जबाब घेऊन पंचनाम्यास सुरूवात करण्यात आली. यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. रेवदंडा पोलिस ठाणे येथे अज्ञात चोरांविरोधात भादवी कलम 457,380 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून अधिक तपास रेवदंडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक देविदास मुपडे हे करीत होते.

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली रेवदंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास मुपडे यांनी तपास करीत पंधरा दिवसांच्या आत आरोपीस ताब्यात घेऊन त्याच्याकडून काही प्रमाणात मुद्देमाल ताब्यात घेत त्याला अलिबाग येथील न्यायालयात हजर केले असता त्यास पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनविण्यात आली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!