मोठे भोम गावातील घटनेने उरण हादरले; पोलिसांचा संशय नातेवाइकांकडे
उरण । घन:श्याम कडू
उरण तालुक्यातील मोठे भोम गावात ९ नोव्हेंबर रोजी मृतावस्थेत आढळलेल्या ९० वर्षीय हिराबाई जनार्दन जोशी यांच्या मृत्यूचा गुंता अखेर उलगडला आहे. ही नैसर्गिक मृत्यू नसून त्यांची बेदम मारहाण करून हत्या झाल्याचे उरण पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले आहे. घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून, आरोपींच्या शोधासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे.
शवविच्छेदन अहवालानुसार हिराबाई यांच्या शरीरावर टणक वस्तूने मारहाण केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांच्या डोक्यापासून छातीपर्यंत तसेच हात-पायांवरही अनेक गंभीर जखमा आढळल्या. घटनास्थळी रक्ताने माखलेल्या दोन तुटलेल्या लाकडी पट्ट्या मिळाल्याने हत्येची क्रूरता अधिक स्पष्ट झाली आहे.
हिराबाई यांनी विकलेल्या चार गुंठे जमिनीतून मिळालेल्या १५ लाखांपैकी पाच ते सहा लाख रुपये नातेवाइकांना दिले होते. या पैशांच्या वाटपावरून वाद निर्माण झाला होता. प्राथमिक तपासात नातेवाइकांपैकीच कुणीतरी या हत्येमागे असण्याची शक्यता अधिक बळावली असून पोलिस त्या दिशेने सखोल चौकशी करत आहेत.
या घटनेमुळे उरण परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपींचा लवकरात लवकर शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
