महाड (विशेष प्रतिनिधी)
आगामी महाड नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेनंतर आता त्यांच्या गुन्हेगारी इतिहासाची माहिती समोर आल्यानंतर मतदारांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. दोन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षेची तरतूद असलेल्या प्रकरणांची नोंद स्वतः उमेदवारांनीच नामनिर्देशनपत्रात जाहीर केली असून, शहराचे नेतृत्व कोणाच्या हाती द्यायचे याविषयी मतदारांमध्ये द्विधाभाव निर्माण झाला आहे.
गुन्हेगारी प्रकरणांची जंत्रीच-जंत्री
नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी उभे असलेल्या नऊ उमेदवारांवर एकूण चौदा गुन्हे प्रलंबित असल्याचे त्यांच्या नामनिर्देशनपत्रातील प्रतिज्ञापत्रातून स्पष्ट होते. विशेष म्हणजे, या यादीत दोन महिला उमेदवारांचाही समावेश आहे.
अनेक उमेदवारांवर 3 ते 4 प्रलंबित गुन्हे असल्याचे नमूद असून, यातील अनेक कलमे गंभीर स्वरूपाची आहेत.
समाविष्ट प्रमुख कलमे:
307 (खून करण्याचा प्रयत्न), 143, 147 (बेकायदेशीर जमाव), 188 (शासकीय आदेशाचे उल्लंघन), 323 (मारहाण), 351, 353 (सरकारी कामात अडथळा), 354 (महिलांवरील अत्याचार), 420 (फसवणूक), 467-468 (बनावट कागदपत्रे), 506 (धमकी), 125 (पोटगी), तसेच इतर गंभीर गुन्हे.
फसवणूक, लोभापोटी कागदपत्रे बनवणे, मारहाण, धमकी, सार्वजनिक शांततेला धोका, दुखापत, महिलांवरील अपराध, गैरव्यवहार अशा प्रकरणांची नोंद असल्याने नागरिकांमध्ये अविश्वासाचे वातावरण अधिक गडद झाले आहे.
मतदार चिंतेत; अविश्वासाची लाट
प्रलंबित प्रकरणांची संख्या व त्यांचे स्वरूप पाहता महाडमधील अनेक मतदार अस्वस्थ आहेत. शैक्षणिक पात्रता, आर्थिक पारदर्शकता आणि आता गुन्हेगारी पार्श्वभूमी — या तिन्ही आघाड्यांवर काही उमेदवारांची लेखी स्थिती कमकुवत असल्याची नागरिकांची भावना आहे.
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार उमेदवारांनी प्रलंबित प्रकरणे जाहीर करणे आवश्यक असते, परंतु ही माहितीच मतदारांच्या मनात निर्माण झालेला अविश्वास अधिक दृढ करत असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
मतदार नाकारतील की सोयीस्कर विसरून मतदान करतील?
महाडच्या राजकीय वातावरणात अनेक गुन्हे तथाकथित “राजकीय प्रेरित” असल्याचा दावा करण्यात येतो. त्यामुळे मतदार प्रत्यक्ष मतदानात हे उमेदवार नाकारतात की पक्षनिष्ठा व स्थानिक समीकरणांच्या आधारावर त्यांच्याकडेच झुकतात, हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.
महाड नगरपरिषद निवडणुकीत गुन्हेगारी पार्श्वभूमी ही निर्णायक ठरण्याची चिन्हे दिसत असून, अंतिम टप्प्यात मतदारांचे मन कोणत्या दिशेने झुकते याकडे सर्वांचे लक्ष आहे.
