• Sun. Dec 21st, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

ताम्हिणी घाटात थार ५०० फूट दरीत कोसळून सहा तरुणांचा मृत्यू

ByEditor

Nov 20, 2025

गंभीर अपघात तीन दिवसांनंतर उघड; ड्रोन सर्चने लागला धागा

माणगाव | सलीम शेख

पुण्याहून कोकणातील पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी निघालेल्या सहा तरुणांचा प्रवास ताम्हिणी घाटात मृत्यूच्या दरीत कोसळून दुर्दैवी अंत झाला. १७ नोव्हेंबरच्या मध्यरात्री महिंद्रा कंपनीची थार (क्र. MH 12 YN 8004) कार कोकणात येत असताना कोंडेथर गावाजवळील अतिशय अवघड वळणावरून गाडी ५०० फूट खोल दरीत कोसळली. घटनेचा उलगडा मात्र तब्बल तीन दिवसांनी झाला असून रायगड आणि पुणे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सहा पर्यटकांचा मृत्यू

या भीषण अपघातात मृत्यू झालेले सहा तरुण पुढीलप्रमाणे :
● प्रथम शहाजी चव्हाण (२२), रा. भैरवनाथ नगर, कोंढवे धावडे, पुणे
● पुनित सुधाकर शेट्टी (२०), रा. कोपरेगाव, उत्तमनगर, पुणे
● साहिल साधू बोटे (२४), रा. कोपरेगाव, उत्तमनगर, पुणे
● महादेव कोळी (१८), रा. कोपरेगाव शाळेमागे, भैरवनाथ नगर
● ओंकार सुनिल कोळी (१८), रा. कोपरेगाव शाळेमागे, भैरवनाथ नगर
● शिवा अरुण माने (१९), रा. पुणे

सर्वांचे मृतदेह बाहेर काढून माणगाव उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहेत.

लोखंडी संरक्षण कठडा तोडून कार दरीत

कोंडेथर भागात उताराचा अत्यंत धोकादायक वळण आहे. येथे बसविण्यात आलेला लोखंडी संरक्षण कठडा तोडून कार दरीत कोसळल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. अपघात झाल्यानंतर सहाही तरुण संपर्काबाहेर गेल्याने त्यांच्या नातेवाईकांनी सतत फोन, सोशल मीडिया आणि संदेशांच्या माध्यमातून संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर सहाही जण बेपत्ता असल्याची तक्रार उत्तमनगर पोलीस ठाण्यात १७ नोव्हेंबर रोजी दाखल झाली.

ड्रोनच्या मदतीने अपघाताचा उलगडा

१९ नोव्हेंबरच्या रात्री माणगाव पोलिसांनी ताम्हिणी घाटात शोधमोहीम सुरू केली. एका ठिकाणी संरक्षण कठडा तुटलेला दिसताच संशय बळावला. ड्रोन सर्व्हेक्षणात दरीत झाडीत चमकणारा थार कारचा भाग दिसल्याने अपघात निश्चित झाला. अंधारामुळे रात्रीची मोहीम थांबवावी लागली; परंतु २० नोव्हेंबर रोजी सकाळी पुन्हा मोठ्या प्रमाणावर रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले.

रेस्क्यू टीमचा जीवघेणा संघर्ष

माणगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे, महामार्ग वाहतूक शाखा, तहसील प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन दल तसेच रोहा येथील सुनील तटकरे युवा प्रतिष्ठानची समर्पण रेस्क्यू टीम यांच्या संयुक्त प्रयत्नांतून ३०० फूट दरीत उतरत सहा मृतदेहांपर्यंत पोहोचण्यात यश आले. झाडे-झुडपे कापत, तीव्र उतार पार करत दुपारी साडेतीनच्या सुमारास सर्व मृतदेह मिळाले.

सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह

ताम्हिणी घाटात अनेक ठिकाणचे संरक्षण कठडे जीर्ण अवस्थेत आहेत. रात्रीची अपुरी प्रकाशव्यवस्था, अवघड वळणे आणि वाढती वाहतूक यामुळे येथे अपघातांची मालिका सुरूच आहे. या दुर्घटनेने घाटातील सुरक्षिततेची दयनीय स्थिती पुन्हा एकदा समोर आली असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळासह संबंधित प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

तरुणांचे वय १८ ते २४ या वयोगटात असल्याने त्यांच्या अकाली मृत्यूने परिसरात मोठी शोककळा पसरली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!