क्रीडा प्रतिनिधी
रायगड : जिल्ह्यातील रिलायन्स नागोठणे येथील क्रिकेट स्टेडियमच्या मैदानावर सुरू असलेल्या कूच बिहार क्रिकेट स्पर्धेतील सामना तिसऱ्या दिवशीच आटोपला. ओडिशाच्या फलंदाजांनी महाराष्ट्राच्या गोलंदाजी समोर अक्षरशः नांगी टाकली. तिसऱ्या दिवशी एकापाठोपाठ एक फलंदाज तंबूत येताना दिसत होते.
महाराष्ट्राच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना ५२८ धावांचा डोंगर उभा केल्यानंतर फलंदाजीला आलेल्या ओडिशाचा संघ दोन्ही डावात ढेपाळला. पहिल्या डावात सर्व गडी बाद २०० धावसंख्या, त्यामध्ये बिश्वजित प्रधान यांनी ४८, स्वागत मिश्रा ४२, पानाकला मोक्षीत यांनी ३७ धावांचे योगदान संघाला दिले. २०० धावसंख्येवर संघाचा डाव संपला. महाराष्ट्राकडून अर्कम सय्यद यांनी सर्वाधिक ५ बळी घेतले तर अभिनंदन अडक यांनी ३ फलंदाजांना ताबूत धाडले.
पहिल्या डावात महाराष्ट्राकडे ३२८ धावांची भक्कम आघाडी होती. ओडिशाचा संघ फॉलोऑन घेऊन पुन्हा फलंदाजीसाठी उतरला आणि अक्षरश: पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळला. एवघ्या २७.५ षटकात ७८ ह्या धावसंख्येवर १० फलंदाज एकापाठोपाठ एक बाद होऊन तंबूत परतले. महाराष्ट्राच्या संमकित सुराना यांनी ५ तर हर्षिल सावंत यांनी ४ फलंदाज बाद केले. महाराष्ट्राच्या संघाने एक डाव व २५० धावांनी दणदणीत विजय प्राप्त केला असून कूच बिहार स्पर्धेला बोनस पॉईंटसह सुरवात केली असल्याने संघाचे मनोबल उंचावले आहे.
महाराष्ट्राच्या संघाने उत्तम फलंदाजी व गोलंदाजी केली असल्याने संघाचे प्रशिक्षक इंद्रजीत कामतेकर व संघ व्यवस्थापक राहुल अरवाडे, सिलेक्टर श्रीकांत काटे, शिरीष कामथे यांनी आनंद व्यक्त केला आहे. रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने सामना यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल रिलायन्स नागोठणे विभाग व सामना अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.
