• Sun. Dec 21st, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

धाकटे शहापूर परिसरात एमआयडीसीचा बेकायदेशीर भराव; शेतकऱ्यांचे शेततळे दूषित, मासे मृतावस्थेत

ByEditor

Nov 20, 2025

अलिबाग : धाकटे शहापूर परिसरातील सिनारमास कंपनीकडे जाणाऱ्या पोहोच रस्त्याच्या कामासाठी एमआयडीसीकडून स्लॅग, मुरूम आणि मातीचा मोठ्या प्रमाणात भराव करण्यात आल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, हा भराव कोणतीही पूर्वपरवानगी न घेता करण्यात आल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थ व शेतकरी करत आहेत.

या भरावामुळे सुजित पाटील यांच्या शेततळ्यात मोठ्या प्रमाणात स्लॅग वाहून गेल्याने तळ्यातील मासे मृतावस्थेत आढळले आहेत. तळ्याचे पाणी पूर्णपणे गढूळ व पांढरट झाले असून, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रत्यक्ष पाहणी अहवालात हे सर्व स्पष्ट करण्यात आले आहे.

गेल्या दोन दिवसांपासून सीमांकनाच्या नावाखाली रस्त्याचे काम सुरू होते. परंतु शेतकऱ्यांच्या मते, भूसंपादन अधिनियम व औद्योगिक विकास अधिनियम यानुसार मोबदला, पुनर्वसन, मुलांना रोजगार, तसेच 15 टक्के विकसित भूखंड या मुद्द्यांवर एकही बैठक न घेता एमआयडीसीने मनमानी पद्धतीने काम सुरू ठेवले. ग्रामस्थांनी काम थांबवण्याची विनंती करूनही पोलीस बंदोबस्तात भरावाची कामे सुरूच राहिली.

प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी डॉ. गजानन खडकीकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यांच्या अहवालानुसार गट क्रमांक 264 व 265 मधील जागेत मोठ्या प्रमाणात स्लॅग टाकण्यात आल्याची, तसेच तोच स्लॅग शेततळ्यातही मिसळल्याची नोंद आहे. तळ्यातील मासे मृतावस्थेत आढळले असून पाणी व स्लॅगचे नमुने तपासणीसाठी गोळा करण्यात आले आहेत. तसेच भराव करताना कांदळवनाची तोड झाल्याचेही अहवालात नमूद केले आहे.

शेतकरी रुपेश पाटील यांनी अद्याप मोबदला न मिळाल्याने हा भराव बेकायदेशीर असल्याचा आरोप केला आहे. शेतकऱ्यांच्या मालकीच्या जमिनीत अनधिकृतपणे काम सुरू असल्याने ग्रामस्थांत तीव्र नाराजी पसरली आहे. या प्रकरणाची तक्रार पोयनाड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

दरम्यान, वन विभागाने कांदळवन तोडीची पाहणी करत तुरंत काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण प्रकरणावर भाष्य करण्यास नकार दिल्याने परिस्थिती अधिकच संशयास्पद बनली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!