महाड । मिलिंद माने
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील नगरपरिषद निवडणुकीसाठी अर्ज छाननीनंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत २१ नोव्हेंबरला संपली. शेवटच्या दिवशी महाड नगर परिषदेसाठी दोन उमेदवारांनी माघार घेतल्याने नगरसेवक पदासाठी २० जागांसाठीची उमेदवार संख्या ५० वरून ४८ वर कमी झाली आहे. तर नगराध्यक्ष पदासाठी दाखल झालेले सर्व ५ उमेदवार अंतिम यादीत कायम असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी व तहसीलदार महेश शितोळे तसेच मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांनी दिली.
अर्ज मागे घेणारे उमेदवार :
प्रभाग क्र. ३ – जागा ३-ब : शुएब मोहम्मद शफी चुडियाल (प्रहार जनशक्ती पक्ष)
प्रभाग क्र. ४ – जागा ४-ब : योगेश काशिनाथ साळवे (अपक्ष)
या दोघांनी माघार घेतल्यानंतर नगरसेवक पदासाठी रिंगणातील अंतिम संख्या ४८ झाली आहे.
नगराध्यक्ष पदासाठी अंतिम पाच उमेदवार :
१) चेतन उर्फ बंटी गजानन पोटफोडे – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)
२) सुदेश शंकर कलमकर – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)
३) सुनील वसंत कविस्कर – शिवसेना (शिंदे गट)
४) ॲड. गणेश सुरेश कारंजकर – अपक्ष
५) पराग पद्माकर वडके – अपक्ष
नगरसेवक पदासाठी १० प्रभागांतील २० जागांसाठी छाननी आणि माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राजकीय वातावरणात तापमान चांगलेच वाढले आहे. महाडमध्ये यंदा नगराध्यक्षपदाची लढत अटीतटीची आणि रंगतदार होण्याची शक्यता राजकीय जाणकारांनी व्यक्त केली आहे.
अर्ज मागे घेण्याची मुदत संपताच सर्वपक्षीय उमेदवारांनी प्रभागनिहाय प्रचार मोहीम जोमात सुरू केली आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रलोभने, तसेच हॉटेल-उपाहारगृहांमध्ये मोठ्या प्रमाणावर पार्ट्या आयोजित करण्याचीही तयारी सुरू आहे. पुढील आठ दिवस उमेदवारांसाठी मतदारांना खुश करण्याचा तुफानी प्रचाराचा काळ ठरणार आहे.
