दिघी । गणेश प्रभाळे
श्रीवर्धन नगरपरिषद निवडणुकीत यंदा सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचाराची धुरा हाती घेतल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. २०११ पासून नगरपरिषदेवर निर्विवाद सत्ता असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी यंदा भारतीय जनता पक्षासोबत युती केली असून, २० पैकी २ जागा भाजपला दिल्या आहेत.
अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दोन दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या सलमा काळोखे (प्रभाग ८-अ) आणि अपक्ष उमेदवार रुपेश मयेकर (प्रभाग ५-ब) यांनी उमेदवारी मागे घेतली आहे.
शिवसेना (शिंदे गट) यांनी अक्षता श्रीवर्धनकर यांना तर शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांनी सन २०१९ चे उमेदवार अतुल चौगुले यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी निष्ठावंत कार्यकर्ते जितेंद्र सातनाक यांना उमेदवार घोषित केले असून, राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांनी रवींद्र चौलकर यांना उमेदवारी दिली आहे.
नगराध्यक्षपदाचे आरक्षण व आजची स्थिती :
आरक्षण : नागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण)
प्रमुख उमेदवार :
जितेंद्र प्रभाकर सातनाक – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)
अतुल अरविंद चौगुले – शिवसेना (उद्धव ठाकरे गट)
अक्षता प्रितम श्रीवर्धनकर – शिवसेना (शिंदे गट)
रवींद्र पोशा चौलकर – राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)
नगराध्यक्ष पदासाठी एकूण चार उमेदवार अखेरच्या यादीत कायम असून, थेट लढत राष्ट्रवादी (अजित पवार गट) विरुद्ध शिवसेना (उद्धव ठाकरे गट) अशी रंगणार असल्याचे संकेत आहेत.
रिंगणातील उमेदवार संख्या :
- नगरसेवक : ६०
- नगराध्यक्ष : ४
- एकूण प्रभाग : १०
- एकूण नगरसेवक जागा : २०
- नगराध्यक्ष : १
- एकूण मतदारसंख्या : १२,६३७
श्रीवर्धन नगरपरिषद निवडणुकीत समिश्र आणि रंगतदार राजकीय वातावरण तयार झाले असून, आगामी काही दिवसांत प्रचार अधिक चुरशीचा होणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.
