माणगाव । सलीम शेख
पुणे–दिघी महामार्गावर विळे-भागाड औद्योगिक क्षेत्रातून सतत धोकादायक प्रमाणात कॉईल वाहतूक करणाऱ्या ट्रेलरचे अपघात वाढले असतानाच आणखी एक गंभीर अपघात पाणोसे पुलाजवळ घडला. नागरिकांच्या वेळीच दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे ट्रेलर चालकाचे प्राण थोडक्यात वाचले.
२१ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता निजामपूरकडून माणगाव दिशेने येणारा ट्रेलर (क्रमांक MH-46-CU-3891) पाणोसे पुलालगतच्या वळणावर नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या एका बाजूला पलटी झाला. ट्रेलरचा कॅबिन पूर्णपणे चेंदामेंदा झाल्याने चालक त्या कॅबिनखाली गंभीर अवस्थेत अडकून पडला होता. जीवाच्या आकांताने मदतीची याचना करणाऱ्या चालकाला वाचवण्यासाठी घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी तातडीने बचावकार्य सुरू केले.
जेसीबी आणि कटरच्या साहाय्याने सुमारे दोन तासांच्या प्रयत्नांनंतर चालकाला सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. अपघाताची माहिती मिळताच माणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि नागरिकांसोबत बचावकार्याला गती दिली.
चालकाला तत्काळ उपजिल्हा रुग्णालय, माणगाव येथे उपचारासाठी हलवण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. या अपघातामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून महामार्गावरील कॉईल वाहतुकीच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
