माणगाव । सलीम शेख
माणगाव नगरपंचायत हद्दीतील साईनगर येथील कालवा नाका परिसरात गुरुवार, २० नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास झालेल्या अपघातात मारुती वॅगनर वाहन कालव्यात कोसळून मोठे नुकसान झाले. सुदैवाने वाहनचालक सुखरूप बचावला. या अपघाताची तक्रार संजय अनंता पालांडे (वय ५६, रा. वाकडाईनगर, माणगाव) यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली आहे.
तक्रारदार संजय पालांडे हे त्यांच्या मूळगावी शिरवली येथील विठ्ठल-रखुमाई देवीच्या पालखी उत्सवानंतर मित्र नंदकुमार रामचंद्र जाधव यांच्या मालकीची मारुती वॅगनर (क्र. MH-08-Z-1913) चालवत माणगावकडे येत होते. ते साईनगर भागातील कालवा नाका परिसरात पोहोचताच मागील बाजूने भरधाव वेगात येणाऱ्या कारने (क्र. MH-46-AD-3915) त्यांच्या वाहनास जोरदार धडक दिली.
धडकेच्या जोरावर मारुती वॅगनर वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या कालव्यात कोसळले व गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अपघात होताच स्थानिक नागरिकांनी मदतकार्य सुरू केले. माहिती मिळताच माणगाव पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात मोटार अपघात रजि. क्र. २९/२०२५ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून, पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार घोडके पुढील तपास करत आहेत.
