उरण । घन: श्याम कडू
उरणच्या बौद्धवाडा परिसरात १० नोव्हेंबरच्या मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील तिन्ही सदस्यांचा मृत्यू झाल्याने शहरावर शोककळा पसरली आहे. नगरपालिका कर्मचारी रमेश शंकर कांबळे, पत्नी रजनी आणि मुलगी निकिता तिघेही गंभीर जखमी झाले होते. मात्र सलग उपचारांनंतर ११, १४ आणि १९ नोव्हेंबर रोजी तिघांनीही अखेरचा श्वास घेतला.
मासळी मार्केटच्या मागील बाजूस असलेल्या कांबळे कुटुंबाच्या घरात मध्यरात्री अचानक आग भडकली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे प्राथमिकदृष्ट्या सांगितले जात असले, तरी स्थानिक ग्रामस्थांनी या प्रकरणामागे संशयास्पद बाबी असल्याचे सांगत घातपाताचा ठाम संशय व्यक्त केला आहे. “ही साधी आग नाही; पोलिसांनी सखोल तपास करावा,” अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
घटनेनंतर उरणमध्ये भीती व संतापाचे वातावरण असून पोलिसांनी तातडीने व्यापक तपास सुरू करून सत्य पुढे आणावे, अशी मागणी नागरीकांनी केली आहे.
