• Wed. Feb 11th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

गोवे रस्त्यावर कॉलेज विद्यार्थ्यांच्या अतिवेगाचा कहर; तरुण गंभीर जखमी, ग्रामस्थ संतप्त

ByEditor

Nov 22, 2025

कोलाड । विश्वास निकम
मुंबई–गोवा महामार्गालगत गोवे गावाकडे जाणाऱ्या वळणदार रस्त्यावर पुन्हा एकदा अतिवेगाचा बळी पडला आहे. गीता द. तटकरे पॉलिटेक्निकल कॉलेजच्या मोटारसायकलस्वार विद्यार्थ्यांनी दिलेल्या जोरदार धडकेत गोवे येथील अनिल तुकाराम दहिंबेकर गंभीर जखमी झाला असून त्याला तत्काळ उपचारासाठी माणगाव येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेनंतर ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

ही घटना शुक्रवार, २१ नोव्हेंबर रोजी घडली. मुंबई–गोवा महामार्गापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या गोवे रस्त्यावर कॉलेजकडून कोलाड दिशेने येणारे विद्यार्थी अतिवेगाने मोटारसायकल चालवत असल्याची तक्रार नागरिकांकडून वारंवार केली जात आहे. रस्त्याला अनेक वळणे असून वाहने नियंत्रित करणे कठीण असतानाही विद्यार्थी बेदरकारपणे वेग वाढवत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे.

गोवे गावातून कोलाडकडे मोठ्या प्रमाणात कामगार, विद्यार्थी आणि नागरिकांची दररोज वर्दळ असते. मात्र, कॉलेज विद्यार्थ्यांच्या बेफिकीर वाहनचालनाामुळे नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. गावातील युवक व ग्रामस्थांनी महाविद्यालयाकडे अनेक वेळा लेखी तक्रार देऊन या विद्यार्थ्यांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी केली आहे.

कॉलेजकडे विद्यार्थ्यांसाठी बससोय असतानाही अनेक विद्यार्थी ती टाळून स्वतःच्या दुचाकींवरून उच्च वेगाने ये-जा करत आहेत. याच निष्काळजीपणामुळे यापूर्वीही गावातील ज्येष्ठ नागरिक खेळू रावजी जाधव (गुरुजी) गंभीर जखमी झाले होते. काही दिवसांनंतर त्यांचा मृत्यू झाला. तरीदेखील परिस्थितीत सुधारणा न झाल्याने ग्रामस्थांत प्रचंड असंतोष आहे.

“विद्यार्थ्यांच्या अतिवेगामुळे गावकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. कॉलेज प्रशासनाने तात्काळ कठोर उपाययोजना करून या बेफाम वाहनचालकांना आळा घालावा. अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन उभारण्यात येईल.
-बळीराम रावजी जाधव
गाव समिती अध्यक्ष

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!