रेवदंडा │ सचिन मयेकर
अलिबाग तालुक्यातील नागाव–माळी भेरसे येथे भावेश प्रमोद पाटील (२४) या तरुणाने मानसिक तणावातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २० नोव्हेंबर रोजी घडली. या प्रकरणाची माहिती त्याचे वडील प्रमोद रघुनाथ पाटील (५५) यांनी रेवदंडा पोलीस ठाण्यात दिली.
भावेश हा जिंदाल ड्रग्स प्रायव्हेट लिमिटेड, एमआयडीसी तळोजा येथे काम करत होता. काही दिवसांपूर्वीच त्याने कंपनीचा राजीनामा दिल्याने तो गेल्या दीड महिन्यापासून बेरोजगार होता. या बेरोजगारीमुळे निर्माण झालेल्या नैराश्याने तो मानसिकदृष्ट्या अधिकच खचला होता, असे कुटुंबीयांनी सांगितले.
घरात कोणी नसताना, भावेशने आपल्या बेडरूममध्ये छतावरील लोखंडी पाईपला ओढणी बांधून गळफास घेतला. कुटुंबीयांच्या निदर्शनास घटना येताच त्याला तातडीने रेवदंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले. या प्रकरणी रेवदंडा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
