श्रीवर्धन । अनिकेत मोहित
श्रीवर्धनच्या आराठी भागात शबीना पेट्रोल पंपाजवळ असलेल्या कोहिनूर बिल्डिंगसमोरची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. इथल्या नाल्यातील पाणी सतत रस्त्यावर येत असून, त्या घाण पाण्यामुळे परिसरात दिवसभर असह्य दुर्गंधी पसरलेली असते. रस्त्यावरून जाणारे वाहनचालक आणि आसपास राहणारे नागरिक यांना नाहक यातना सहन कराव्या लागत आहेत.
या समस्येबाबत अनेक वेळा ग्रामपंचायतीकडे तक्रारी करण्यात आल्या, पण त्या तक्रारींना आजवर काहीही प्रतिसाद मिळालेला नाही. इतक्या वेळा सूचना करूनही कोणतीही कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. ही समस्या जाणीवपूर्वक दुर्लक्षित केली जात आहे का, असा प्रश्न परिसरातील लोकांमध्ये जोरात चर्चिला जात आहे.
रस्त्यावर वाहणारे हे नाल्याचे पाणी केवळ अस्वच्छतेचे प्रतीक नाही, तर आजारांना आमंत्रण देणारी धोकादायक परिस्थिती निर्माण करत आहे. लहान मुले, वृद्ध आणि महिलांना विशेष त्रास सहन करावा लागत असून, व्यापारी आणि दुकानदारही या दुर्गंधीमुळे हैराण झाले आहेत.
ग्रामपंचायतीने तातडीने या समस्येकडे लक्ष द्यावे, नाल्याची स्वच्छता व दुरुस्ती करावी आणि परिसर पुन्हा स्वच्छ, सुरक्षित करावा अशी मागणी नागरिकांनी केली असून आता लोकांचा संयम सुटत चालला आहे. प्रशासनाविरोधात कठोर भूमिका घेण्याची शक्यता बोलली जात आहे.
