उरण | घनःश्याम कडू
उरण तालुक्यातील मोठेभोम गावात पैशाच्या हव्यासापोटी घडलेल्या एका विकृत आणि हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने संपूर्ण तालुका स्तब्ध झाला आहे. 90 वर्षीय हिराबाई जनार्दन जोशी यांचा मृत्यू अपघाती नसून खून असल्याचे पोलिस तपासातून धक्कादायक उघड झाले असून, हा खून त्यांच्या जावयानेच केल्याचा निष्कर्ष समोर आला आहे.
ही घटना 9 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी घडली. सुरुवातीला नातेवाईकांनी “पडून मृत्यू” अशी माहिती उरण पोलिस ठाण्यात दिली होती. मात्र मृतदेहाच्या तपासणीदरम्यान हिराबाई यांच्या डोक्यावर खोल व गंभीर जखम आढळून आल्याने पोलिसांचा संशय अधिक दृढ झाला. त्यानंतर करण्यात आलेल्या शवविच्छेदनात त्यांच्या डोक्यावर टणक वस्तूने मारहाण झाल्याचे स्पष्ट झाल्याने प्रकरणाचा वेगाने खुनाच्या दिशेने कल पाहायला मिळाला.
या प्रकरणाचा तपास उरण पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सुनील केदार, पो.उनि. संजय राठोड, हवालदार मच्छिंद्र कोळी यांच्यासह विशेष पथकाने केला. सातत्यपूर्ण चौकशी, तांत्रिक पुरावे आणि वैज्ञानिक तपासाच्या आधारे पोलिसांनी हिराबाईंचे जावई सुरेश सावळाराम पाटील (47) याला ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीत अखेर आरोपी खचला आणि खून केल्याची कबुली दिली.
आरोपीला अटक करून उरणच्या कनिष्ठ न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 27 नोव्हेंबरपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, या भयानक गुन्ह्यामागील मूळ कारण म्हणजे पैशाची अंध लालसा असल्याचे तपासात उघड झाले आहे. काही दिवसांपूर्वी हिराबाई यांनी जमीन विक्रीतून मिळालेली 15 लाख रुपयांची रक्कम बँकेत जमा केली होती. त्यापैकी 6 लाख रुपये त्यांनी मुलींना आणि नातेवाईकांना दिले होते. उरलेल्या रकमेच्या वाटपासाठी घटना घडलेल्या दिवशी घरात बैठक होणार होती. याच पैशावर डोळा ठेवून आरोपी जावयाने वाद घडवून आणला आणि संतापाच्या भरात वृद्ध सासूच्या डोक्यावर टणक वस्तूने हल्ला करून त्यांचा निर्दयीपणे खून केला, असा तपासाचा निष्कर्ष आहे.
पैशाच्या हव्यासाने अंध झालेल्या एका व्यक्तीने 90 वर्षीय वृद्ध सासूचा जीव घेणे ही घटना केवळ धक्कादायकच नाही, तर समाजाचा अंतर्मुख करणारी आहे. उरण तालुका या क्रूरकर्माने अक्षरशः हादरून गेला आहे.
