श्रीवर्धन | अनिकेत मोहित
श्रीवर्धन शहरातील स्मशानभूमीतील मूलभूत सुविधांच्या अभावाचे दर्शन घडवणारी धक्कादायक घटना काल समोर आली. परिसरात पुरेशा प्रकाशयोजनेचा अभाव आणि अरुंद, अस्वच्छ जागेमुळे अंत्यविधी पार पाडण्यासाठी नागरिकांना अक्षरशः मोबाईलच्या प्रकाशाचा आधार घ्यावा लागला. या अडचणींमुळे उपस्थितांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागला.
स्मशानभूमी परिसरात प्रकाशयोजना नसल्याने अंधार दाटून राहतो. त्यातच अस्वच्छता, अरुंद मार्ग आणि देखभालीचा अभाव यामुळे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. अनेक वर्षांपासून या समस्यांबाबत तक्रारी होत असल्या तरी कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही, अशी नाराजी स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, अंत्यविधीसारख्या अत्यंत संवेदनशील प्रसंगी तरी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध असणे अपेक्षित आहे. त्यामुळे नगरपालिकेने स्मशानभूमीतील प्रलंबित विकासकामे युद्धपातळीवर पूर्ण करून प्रकाशयोजना, स्वच्छता आणि मूलभूत सोयी तत्काळ उपलब्ध कराव्यात, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
