तात्पुरता मार्गावरील प्रवाशांची दगदग संपणार कधी?
गणेश प्रभाळे
दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील शेखाडी मार्गावरील दिवेआगर गावाजवळ नव्याने होत असलेल्या पुलाच्या कामाला दिरंगाई झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणारा पुल, लवकरच सुरळीत करून वाहतुकीसाठी सुरू करावा अशी मागणी करण्यात येत आहे.

बोर्लीपंचतनहून श्रीवर्धनकडे जाणारा हा मार्ग समुद्रकिनाऱ्यालगत जोडला आहे. या सतरा किलोमीटर अंतरातील मार्गावर मुंबईतील नरिमन पॉईंटची अनुभवती येते. त्यामुळे हा मार्ग पर्यटनाच्या दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण ठरत आहे. मात्र, याच मार्गावरील पूल निधीअभावी रखडला आहे.
यावर्षी पावसाळी दोन वेळा अतिवृष्टीने पूल पाण्याखाली गेला. या अडथळ्यांमुळे नागरिकांना दगदग सहन करावी लागली. श्रीवर्धनला जाणारा प्रमुख दिवेआगर-भरडखोल-शेखाडी असा मार्ग आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून येथे सुरू असलेल्या कामामुळे मूळ पूल पाडण्यात आला आहे. त्याऐवजी तात्पुरता पर्यायी रस्ता बनवण्यात आला आहे. नदीपलीकडे जाण्यासाठी मोऱ्या टाकून पर्यायी मार्ग तयार केला खरा मात्र, तो देखील सुरक्षित नाही. त्यामुळे पुलाचे काम लवकरच मार्गी लावावे अशी मागणी करण्यात येत आहे.
पुल बांधकामातील पाण्याचा अडथळा कमी होत आहे. पिलर्सचे आता काम सुरू करणार असून डिसेंबर पर्यंत पुल पूर्ण होईल.
-अक्षय महाजन
अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग
