धुके आणि सुरू असलेल्या कामामुळे बॅरिकेट न दिसल्याने दुर्घटना
महाड | मिलिंद माने
मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चालू कामे आणि पहाटेच्या धुक्यामुळे रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात भीषण अपघात घडला. सोमवारी (दि. २४) पहाटे सुमारास भोगाव गावानजीक खासगी ट्रॅव्हलर बस ५० फूट खोल दरीत कोसळून झालेल्या या दुर्घटनेत २२ प्रवाशी गंभीर जखमी झाले असून १० प्रवाशांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती मिळते.

मुंबई–गोवा महामार्गावर सुरू असलेल्या कामामुळे एक लेन बंद होती. दाट धुक्यामुळे चालकाच्या नजरेस बॅरिकेटस् न पडता बस पुलालगतच्या बॅरिकेटवर जोरात आदळली आणि थेट दरीत कोसळली. अपघात होताच स्थानिक नागरिकांनी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. पोलादपूर पोलिस, महामार्ग सुरक्षा पथक आणि स्थानिक रेस्क्यू टीमनेही घटनास्थळी पोहोचून जखमींना वर काढत तातडीने रुग्णालयात हलवले.

जखमींना खेड तालुक्यातील कळंबनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची नावे पुढीलप्रमाणे :
शामल विजय अंजर्लेकर (४०, गिम्हवणे-दापोली), काजल मारुती शिगवण (२३, दमामे-दापोली), दिलीप शिवराम मोहिते (५५, तळसर-चिपळूण), अमरनाथ मिलिंद कांबळे (२७, लातूर), दिपाली दत्ताराम नाचरे (२७, भडवणे-दापोली), प्रतीक प्रकाश गुरव (२२, शिरवली-खेड), प्रिया प्रकाश गुरव (२३, शिरवली-खेड), आळंदी बालाजी नाचरे (७४, दमामे-दापोली), सर्वेश दीपक गुहागरकर (२२, आडे-दापोली), मयुरी मारुती शिगवण (४५, दमामे-दापोली). याशिवाय चालक, वाहक आणि इतर दहा प्रवाशांना चिपळूण येथील खासगी रुग्णालये तसेच डेरवण रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. महामार्ग पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी विशेष पथके तैनात केली आहेत.
धुके, महामार्गावरील सुरू असलेले काम आणि बॅरिकेटिंगची अस्पष्टता यामुळे हा भीषण अपघात झाल्याची प्राथमिक माहिती असून पुढील तपास पोलादपूर पोलीस करीत आहेत.
