• Sun. Dec 21st, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरणमध्ये तणावपूर्ण शांततेत मतदान प्रक्रिया पार

ByEditor

Dec 2, 2025

उरण नगरपरिषदेच्या निवडणुकीत गुलाल कोण उधळणार याची सर्वांना उत्सुकता

उरण । अनंत नारंगीकर
उरण नगर परिषदेची सार्वत्रिक-२०२५ ची निवडणूक प्रक्रिया मंगळवारी (दि. २) १० प्रभागावरील २९ बुथवर पार पडली. यावेळी सकाळपासून मतदारांनी मतदान केंद्रावर आपली हजेरी लावून आपला मतदानाचा हक्क बजावला. मात्र काही ठिकाणी बाचाबाचीचे प्रकार झाल्याच्या घटना घडल्या. उरणचे आमदार महेश बालदी व माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी सदरची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे मत मोजणीच्या दिवशी कोण गुलाल उधळणार याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे.

उरण नगर परिषदेच्या निवडणुकीत एकूण २६ हजार दोनशे चौदा मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.नगराध्यक्ष पदासाठी ४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून २१ नगरसेवक पदासाठी ४९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.भाजपाचे आमदार महेश बालदी यांनी हि निवडणूक प्रतिष्ठेची केली असून नगराध्यक्ष पदासाठी सौ.शोभा कोळी – शहा यांना उमेदवारी दिली आहे. तर माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून भावनाताई घाणेकर यांना उमेदवारी दिली आहे. तसेच शिवसेना शिंदे गटानी रुपाली ठाकूर यांना नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दिली आहे. मात्र खरी लढत ही भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शोभा कोळी-शहा व महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार भावनाताई घाणेकर यांच्यात होणार आहे. मंगळवारी मतदानाच्या दिवशी काही मतदार केंद्रावर बाचाबाचीचे प्रकार घडले.

यावेळी भाजपचे आमदार महेश बालदी, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, प्रितम म्हात्रे, जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत घरत, जितेंद्र म्हात्रे, पंडित घरत, सीमाताई घरत, सह इतर भाजपाचे पदाधिकारी यांनी मतदान केंद्रावर भेट देऊन १०० टक्के मतदारांचा कौल आपल्यालाच असल्याने भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार व २१ नगरसेवक पदाचे उमेदवार विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला. महाविकास आघाडीकडून खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा, माजी आमदार मनोहरशेठ भोईर, माजी आमदार बाळाराम पाटील, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत, उपजिल्हा प्रमुख नरेश रहाळकर, तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, शेकापचे तालुका चिटणीस रवि घरत यांनी मतदान केंद्रावर भेट देऊन पोलीस यंत्रणेला शांततेत मतदान प्रक्रिया पार पडण्याचे सुचित केले. मात्र मतदानाच्या दिवशी काही केंद्रावर बाचाबाचीचे प्रकार झाल्याच्या घटना घडल्याने शांततेत मतदान प्रक्रिया पार पडण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ७५ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असला तरी २१ डिसेंबरला निकालाच्या दिवशी गुलाल उधळणार कोण याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!