श्रीवर्धन । अनिकेत मोहित
श्रीवर्धन नगरपरिषद निवडणुकीत आज मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत लोकशाहीचा उत्सव साजरा केला. पहाटेपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांची रांग दिसू लागली होती. वातावरणात उत्साह, अपेक्षा आणि लोकशाहीवरील विश्वास स्पष्टपणे जाणवत होता. कोणताही अनुचित प्रकार न घडता संपूर्ण प्रक्रिया सुरळीत पार पडली आणि दिवसअखेर ६६.२३ टक्के मतदानाची नोंद झाली.
यावेळी महिलांचा सहभाग अधिक लक्षणीय ठरला. ४,१९२ महिला मतदारांनी हक्क बजावला, तर ४,१७८ पुरुषांनी मतदान करून निवडणूक प्रक्रियेत सहभाग नोंदवला. शहरातील ज्येष्ठ नागरिकांपासून तरुणांपर्यंत सर्वांनी समान उत्साह दाखवला.
प्रशासन, निवडणूक विभाग आणि पोलीस यंत्रणेच्या नियोजनामुळे मतदारांना कोणताही त्रास सहन करावा लागला नाही. निवडणूक केंद्रांवर स्वच्छता, पिण्याचे पाणी, रॅम्प व सुविधांची व्यवस्था असल्यामुळे दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांनाही सहज मतदान करता आले.
दिवसभर शांतता आणि संयमाचे वातावरण राहिल्याने निवडणुकीनंतर शहरात समाधानाची भावना व्यक्त होत आहे. आता सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे.
