मतदानासाठी पोहोचण्यापूर्वीच 21 वर्षीय नेहा ठाकूरच्या नावावर मतदान; प्रशासन मौन, निवडणूक प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह
उरण : घनःश्याम कडू
उरण नगर परिषद निवडणुकीत अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रभाग क्रमांक 10 मधील 21 वर्षीय मतदार नेहा मनोहर ठाकूर मतदानासाठी केंद्रावर पोहोचण्यापूर्वीच तिच्या नावावर कुणीतरी मतदान केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या घटनेमुळे निवडणूक प्रक्रियेवरील प्रश्नचिन्ह अधिक गडद झाले आहे.
नेहा ठाकूर आज सकाळी सुमारास दहा वाजता एन. आय. हायस्कूल येथे मतदानासाठी गेली. काही वेळ रांगेत उभे राहिल्यानंतर ती मतदानासाठी आत पोहोचली असता तिच्या नावावरील मतदान आधीच नोंद झाल्याची माहिती तिला देण्यात आली. या प्रकारामुळे संतापलेल्या नेहा ठाकूर हिने मतदान केंद्रात तीव्र आक्षेप नोंदवत धसका दिला. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी वर्गाने बैठक घेऊन अखेर तिला विशेषतः बॅलेट पेपरद्वारे मतदानाची परवानगी दिली.
मात्र, नेमक्या कुणी तिच्या नावाने मतदान केले? हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे. या प्रकरणाविषयी विचारणा केली असता मुख्य निवडणूक अधिकारी तथा उरण तहसीलदार उद्धव कदम यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. यामुळे निवडणूक यंत्रणा कोणाच्या दबावाखाली काम करत आहे का, असा संशय उपस्थित होत आहे.
उरण नगर परिषद निवडणूक यंदा विशेषतः तणावपूर्ण वातावरणात होत असून आधीच पाच हजारांहून अधिक बोगस मतदार असल्याचा आरोप समोर आला होता. काही दिवसांपूर्वी एका मतदान केंद्रातच भाजपाच्या उमेदवाराने प्रत्यक्ष भेट घेऊन बैठक केल्याची घटना उघड झाली होती. त्यातच आता मतदानाच्या दिवशीच झालेल्या बोगस मतदानाने प्रशासनाची विश्वासार्हता पुन्हा एकदा तपासणीच्या पिंजऱ्यात उभी केली आहे.
या प्रकारामुळे संबंधित तरुणीच्या नावाने थेट मतदान करणारी व्यक्ती कोण होती, हे शोधणे अत्यंत गरजेचे ठरत असून याबाबत निवडणूक आयोगाने तातडीने चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
