श्रीवर्धन | अनिकेत मोहित
श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना आणि पर्यटकांना घोडा व्यावसायिकांच्या निष्काळजीपणामुळे सातत्याने त्रास सहन करावा लागत आहे. समुद्रावर नव्याने करण्यात आलेल्या सुशोभीकरणाच्या जागेवरदेखील काही व्यावसायिकांकडून घोडे बांधून ठेवले जात असल्याचे चित्र समोर आले आहे. यामुळे परिसरात घाणीचा प्रश्न निर्माण होत असून समुद्रकिनाऱ्याचे सौंदर्य आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
घोड्यांसाठी योग्य जागा नसतानाही सार्वजनिक सुशोभीकरणाच्या जागेला तबेला बनविण्याचा हा प्रकार लोकांच्या टीकेचा विषय ठरत आहे. स्थानिक नागरिकांनी नगरपालिकेने याकडे तातडीने लक्ष देऊन ठोस कारवाई करावी, तसेच समुद्रकिनारा स्वच्छ, सुरक्षित आणि शिस्तबद्ध राहण्यासाठी निश्चित नियमावली लागू करावी, अशी जोरदार मागणी केली आहे.
नगरपालिकेच्या योग्य हस्तक्षेपाशिवाय ही समस्या वाढतच जाणार असल्याची भीती नागरिक व्यक्त करत असून प्रशासनाने तत्काळ पावले उचलण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
