माणगाव येथील पत्रकार परिषदेत सुधीर पवार यांनी केली अधिकृत घोषणा
माणगाव । सलीम शेख
माणगाव तालुक्यातील निजामपूर येथील सुधीर दत्तूशेठ पवार यांनी शिवसेना उपतालुका प्रमुख पदाचा राजीनामा देत असल्याचे अधिकृत घोषणा माणगाव येथील अशोकदादा साबळे विधी महाविद्यालय याठिकाणी सोमवार, दि. ८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केली.
यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना सुधीर पवार यांनी सांगितले कि, मी शिवसेना पक्षाचा उपतालुका प्रमुख असतानाही गेली काही महिन्यांपासून मला पक्षामार्फत होत असलेल्या विविध विकासकामांची भूमिपूजन व उदघाटने या कार्यक्रमांतून वेळोवेळी डावलले जात होते. मंत्री भरतशेठ गोगावले यांनीही माझ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. निजामपूर विभागातील शिवसेना पक्षाची अंतर्गत असणारी गटबाजी याला कंटाळून मी पक्षाच्या उपतालुकाप्रमुख पदाचा राजीनामा देत आहे. माझी पुढची राजकीय भूमिका याबद्दल सांगायचे झाले तर, मागील दोन जिल्हा परिषद निवडणुकांत आम्ही पवार कुटुंबीयांनी चंद्रकांत गोपाळ व द्रौपदी पवार यांना निवडून आणण्यासाठी फार मोठे योगदान दिले. यापुढे जिल्हा परिषदेची निवडणूक जाहीर झाल्यावर पुन्हा मी पत्रकार परिषद घेऊन माझी पुढील राजकीय भूमिका स्पष्ट करेन असे सांगितले.
या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे कोकण विभाग प्रवक्ते ॲड. राजीव साबळे, मिलिंद फोंडके, ज्येष्ठ नेते सिराज परदेशी, राष्ट्रवादीचे माणगाव शहरप्रमुख सुनील पवार, विरेश येरुणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
