उरण । अनंत नारंगीकर
उरण तालुक्यातील नवघर – खोपटा रस्त्यावर आज, सोमवारी (दि. ८) दुपारी दीडच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात भेंडखळ गावातील अमोल काळूराम ठाकूर (वय ३८) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. बाँमण लाँडी यार्डजवळ हा अपघात घडला. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरून ‘रास्ता रोको’ आंदोलन केले.
मिळालेल्या माहितीनुसार, भेंडखळ येथील अमोल काळूराम ठाकूर हा तरुण दुपारी सुमारे १:३० वाजता आपल्या मोटारसायकलवरून खोपटा गावाकडे जात होता. नवघर – खोपटा रस्त्यावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनर ट्रेलरने (एमएच ४२ बीयू ५०७२) अमोलच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेनंतर कंटेनरने अमोलला काही अंतरावर फरफटत नेले, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि कंटेनर ट्रेलरला ताब्यात घेतले. या रस्त्यावर सातत्याने होणाऱ्या अपघातांमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करत रस्त्यावर ठिय्या मांडून रास्ता रोको केला.
या अपघाताची माहिती भेंडखळ गावातील नागरिकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ. भावनाताई घाणेकर यांनी तत्काळ पोलिसांना दिली. उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनीफ मुलानी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.
मृत अमोल ठाकूर हा भेंडखळ गावातील रहिवासी असून त्याच्या पश्चात पत्नी आणि दोन लहान मुले असा परिवार आहे. या अपघाताची नोंद उरण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
