बेकायदा बॉक्साईट कंपनीविरोधात आंदोलन; शिंदेसेनेचा पाठिंबा
गणेश प्रभाळे
दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील गडबवाडी येथे सुरु असलेल्या बॉक्साईट खाणीविरोधात स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. या बेकायदा उत्खननामुळे गावात येणाऱ्या संकटामुळे संतप्त ग्रामस्थांनी सोमवारी मोर्चा काढला. या मोर्चात गावकऱ्यांना शिंदे शिवसेनेने पाठिंबा दिला आहे.
हरिहरेश्वर तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळाजवळील गडबवाडी या गावाला जोडून असलेल्या स्थानिक नागरिकांच्या मालकी जागेत बॉक्साईट खाण आहे. तेथील उत्खननामुळे निसर्गरम्य पर्वत पूर्णपणे नष्ट होऊन गावाला अनेक समस्यांनी हानी पोहचत असल्यामुळे बॉक्साईट मायनिंग प्रकल्प तातडीने बंद करण्यात यावा यासाठी मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनात गाव वाचवण्यासाठी मुंबई स्थित 160 ग्रामस्थांनी गावाकडे धाव घेतली व त्यांच्या पाठीशी शिवसेना जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर कार्यकर्त्यांसह सहभागी झाले.
मागील तेरा वर्षापूर्वी आशापुरा कंपनीकडून याठिकाणी होत असलेल्या बॉक्साईट खाणी बंद करण्यात आले असतानाच आता पुन्हा एकदा तालुका संघर्षाच्या पवित्र्यात उभा ठाकला आहे. मात्र, यावेळी जनतेला शिवसेनेचा पाठिंबा मिळत असल्याने बॉक्साईट उत्खननावरून आणखी एक संघर्ष सुरू होण्याची लक्षणे दिसू लागली आहेत.
या कंपनीने मोठया प्रमाणात बॉक्साईट मालाचे उत्खनन करताना सुरुंग स्फोट घडवून तसेच पोकलन मशिन व जेसीबी मशिनद्वारे उत्खनन करुन येथील डोंगरपर्वत पूर्णपणे उध्वस्त केल्यामुळे या पर्वताला मोठमोठ्या भेगा पडून जमीन कमकुवत झाल्यामुळे गाव वस्तीच्या माथ्यावर भूस्खलनाचा धोका निर्माण झालेला आहे. यावेळी ग्रामस्थांचा मोर्चा बॉक्साईट खाणी ठिकाणी जाऊन धडकला आहे. ग्रामस्थांनी प्रशासनासमोर सर्व अडचणी मांडून खाणीविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, काम बंद करण्याचा इशारा दिला आहे.

