कोप्रोली, पुनाडे परिसरात बिबट्याचा वावर; दोन बकऱ्या, दोन कुत्रे फस्त
वन विभागाचे आठ तास प्रयत्न असफल
उरण । अनंत नारंगीकर
उरण तालुक्यातील कोप्रोली आणि पुनाडे येथील डोंगर परिसरातील आदिवासी नागरी वस्तीमध्ये मंगळवारी (दि. ९) रात्रीच्या अंधारात बिबट्याने शिरकाव केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या बिबट्याने दोन बकऱ्या आणि दोन कुत्रे फस्त केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये कमालीची भीती पसरली असून, बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभाग आणि स्थानिक नागरिक गेल्या आठ तासांपासून अथक प्रयत्न करत आहेत, मात्र अद्याप बिबट्याला पकडण्यात यश आलेले नाही. त्यामुळे, ‘बिबट्या आला रे आला, उरणकरांनो सावधान’ अशी परिस्थिती उरण तालुक्यात निर्माण झाली आहे.
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
मंगळवारी रात्रीच्या सुमारास पुनाडे आणि कोप्रोली येथील वस्तीत बिबट्या शिरल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांमध्ये एकच धावपळ माजली. अनेक रहिवाशांनी आपली दारे-खिडक्या घट्ट बंद करून घरात राहणे सुरक्षित मानले, तर काहींनी बिबट्याला पाहण्यासाठी घटनास्थळी गर्दी केली.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक, भाजपचे उरण पूर्व विभाग अध्यक्ष शशिकांत पाटील, आदिवासी बांधव आणि परिसरातील नागरिक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. वन विभागाकडून नागरिकांना वारंवार सावधानतेच्या सूचना देण्यात येत आहेत.
नागरिकांच्या जीवितास धोका होण्याची शक्यता
याबाबत बोलताना भाजप उरण पूर्व विभाग अध्यक्ष शशिकांत पाटील यांनी प्रशासनाकडे तातडीने रेस्क्यू टीम दाखल करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, “पुनाडे, कोप्रोलीमधील डोंगर परिसरात बिबट्याचा वावर आढळून आला आहे. वन विभागाने तातडीने रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल करण्यासाठी पुढाकार घ्यावा. आज सदर बिबट्याने दोन बकऱ्या आणि दोन कुत्रे खाऊन टाकले आहेत; उद्या नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो.”
बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न अजूनही सुरूच आहेत. नागरिकांनी खबरदारी घ्यावी आणि रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात येत आहे.
