उरण | घनश्याम कडू
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय राष्ट्रीय नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, या ठाम मागणीसाठी आज बुधवार, १० डिसेंबर २०२५ रोजी, दिल्लीतील संसदभवनाच्या आवारात संतप्त निदर्शने करण्यात आली. महाराष्ट्रातील अनेक खासदारांनी एकत्रितपणे केंद्र सरकारकडून या मागणीचा तातडीने विचार व्हावा यासाठी जोरदार आवाज उठवला.
या आंदोलनात खासदार सुरेश म्हात्रे (बाळू मामा), सुप्रिया सुळे, दिना बामा पाटील यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक खासदारांनी सहभाग घेतला. “दि. बा. पाटील यांचे नाव देणे हा उपकार नाही, आमचा हक्क आहे,” असे सांगत खासदारांनी केंद्र सरकारसमोर आपली भूमिका ठामपणे मांडली.
नवी मुंबई विमानतळ प्रकल्पासाठी उरण–पनवेल–नवी मुंबई परिसरातील हजारो कुटुंबांनी जमीन सोडली, घरे–गावे गमावली आणि आयुष्य उद्ध्वस्त झाले. या त्यागाचा सन्मान म्हणून विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, ही मागणी वर्षानुवर्षे प्रलंबित आहे. आजच्या आंदोलनामुळे या संघर्षाला नव्याने उर्जा मिळाल्याचे निदर्शनेतून दिसून आले.
संसदभवनाबाहेर “दि. बा. पाटील साहेबांचा सन्मान अबाधित ठेवा!”, “भूमिपुत्रांचा अपमान सहन करणार नाही!” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांचा एकमुखी निर्धार पाहता केंद्र सरकारने हा मुद्दा तातडीने निर्णय प्रक्रियेत आणावा, अशी मागणी निदर्शनांतून करण्यात आली.
महाराष्ट्रातील भूमिपुत्रांचा सन्मान आणि न्यायाचा प्रश्न असल्याने या मागणीवर तडजोड होणार नाही, असा इशाराही खासदारांनी आज दिल्लीच्या दारात उभे राहून दिला.
