रेवदंडा | सचिन मयेकर
अलिबाग तालुक्यातील वळवली (आदिवासी वाडी) येथील एका २६ वर्षीय विवाहितेने जंगलात झाडाला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अंकिता महेश नाईक असे मृत महिलेचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १५ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२:२० च्या सुमारास अंकिताचे पती महेश दत्ताराम नाईक हे मित्रांसह जंगलात गेले होते. त्यावेळी अंकिता आणि तिची बहीण घरीच होत्या. सायंकाळी ४:०० वाजता महेश घरी परतले असता त्यांना पत्नी घरात दिसून आली नाही.
अंकिता घरी नसल्याचे समजताच पती व नातेवाईकांनी सर्वत्र शोधाशोध केली, मात्र ती मिळून आली नाही. अखेर दुसऱ्या दिवशी, १६ डिसेंबर रोजी सकाळी ६:०० वाजण्याच्या सुमारास नातेवाईक आणि ग्रामस्थांनी डोंगराळ भागात शोध घेतला असता, अंकिताचा मृतदेह जंगलातील एका झाडाला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
नातेवाईकांनी तिला तातडीने खाली उतरवून रेवदंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद (अ.मृ. रजि. नं. ४४/२०२५) करण्यात आली आहे. अंकिताने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचा अधिक तपास रेवदंडा पोलीस करत आहेत.
