उरण विधानसभा मतदारसंघात खळबळ; आगामी निवडणुकांच्या तोंडावर पक्षाला मोठा फटका बसण्याची शक्यता
उरण | विठ्ठल ममताबादे
उरण विधानसभा मतदारसंघात शिवसेना (शिंदे गट) पक्षात मोठी बंडाळी माजली आहे. कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या ‘एकतर्फी’ आणि ‘मनमानी’ कारभाराचा निषेध करत उरण व पनवेल तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे सामूहिक राजीनामे पक्षाचे सचिव संजय मोरे यांच्याकडे सुपूर्त केले आहेत. या राजकीय भूकंपामुळे रायगड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
जिल्हाप्रमुख बदलामुळे शिवसैनिकांमध्ये संताप
मिळालेल्या माहितीनुसार, उरण विधानसभा मतदारसंघात शिवसेना वाढीसाठी वर्षानुवर्षे मेहनत घेणारे जिल्हाप्रमुख अतुल भगत यांना विश्वासात न घेता पदावरून बाजूला करण्यात आले आहे. त्यांच्या जागी विनोद साबळे यांची प्रभारी जिल्हाप्रमुख म्हणून केलेली नियुक्ती शिवसैनिकांच्या जिव्हारी लागली आहे. निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून लादण्यात आलेल्या या निर्णयामुळे पक्षात असंतोषाचा स्फोट झाला आहे.
प्रमुख पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
आमदार महेंद्र थोरवे हे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता निर्णय घेत असून, त्यांच्याकडून कार्यकर्त्यांना त्रास दिला जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याचा निषेध म्हणून दीपक ठाकूर (उरण तालुका प्रमुख), रघुनाथ पाटील (पनवेल तालुका प्रमुख) यांच्यासह उरण विधानसभा क्षेत्रातील अनेक विभाग प्रमुख आणि सक्रिय पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.
आगामी निवडणुकांवर सावट
पक्षवाढीसाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या जिल्हाप्रमुखांना बाजूला केल्याने आणि अंतर्गत वादाला तोंड फुटल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेला (शिंदे गट) मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत. “आमदारांच्या मनमानीमुळे प्रामाणिक कार्यकर्त्यांवर अन्याय होत आहे,” अशी भावना संतप्त शिवसैनिकांनी व्यक्त केली आहे.
आणखी राजीनामे येणार?
सध्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले असून, येत्या काही दिवसांत आणखी शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी आपले राजीनामे पक्षश्रेष्ठींकडे सुपूर्त करण्याच्या तयारीत असल्याचे समजते. यामुळे उरणमधील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे.
