मद्यधुंद पर्यटकांनी दोन दुचाकींना उडवले; ४० फूट फरफटत नेल्याने तरुणाचा जागीच अंत
श्रीवर्धन | अनिकेत मोहित
पर्यटननगरी श्रीवर्धनमध्ये पर्यटकांच्या बेदरकारपणाने पुन्हा एका निष्पाप स्थानिकाचा बळी घेतला आहे. पुण्याहून आलेल्या एका काळ्या रंगाच्या थार जीपने दोन दुचाकींना भीषण धडक दिली. या अपघातात परवेज हमदुले या तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. थारमधील पर्यटक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा संशय असून, या घटनेमुळे श्रीवर्धन शहरात संतापाची लाट उसळली आहे.
काळजाचा थरकाप उडवणारा अपघात
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून पर्यटनासाठी आलेले काही तरुण थार जीप (MH 12 VW 8055) घेऊन समुद्रकिनाऱ्याकडे जात होते. मुख्य रस्त्यावर चालकाने गाडी चुकीच्या बाजूने (Wrong Side) अतिवेगात नेली आणि समोरून येणाऱ्या दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की, परवेज हमदुले यांना थारने सुमारे ४० फूट फरफटत नेले. डोक्याला गंभीर इजा झाल्याने परवेज यांचा जागीच मृत्यू झाला.
पर्यटक मद्यधुंद असल्याचा संशय
अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. थारमधील चारही तरुण मद्यधुंद अवस्थेत असल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. या बेजबाबदारपणामुळे संतप्त झालेल्या जमावाने दोषींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी रस्ता रोखण्याचा प्रयत्न केला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून श्रीवर्धन पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जमावाला शांत केले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.
पोलिसांनी चौघांना ठोकल्या बेड्या
श्रीवर्धन पोलिसांनी थारमधील चारही युवकांना ताब्यात घेतले आहे. त्यांची वैद्यकीय तपासणी केली जात असून, चालकावर मनुष्यवधासारखे गंभीर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पर्यटनस्थळी वाढती हुल्लडबाजी आणि बेदरकार वाहनचालनावर पोलिसांनी कायमस्वरूपी लगाम लावावा, अशी मागणी आता स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
शहरात शोककळा
परवेज हमदुले या तरुण आणि मनमिळावू तरुणाच्या अपघाती मृत्यूमुळे श्रीवर्धन शहरात शोककळा पसरली आहे. शहरात तणावपूर्ण शांतता असून खबरदारीचा उपाय म्हणून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
