नागोठणे | किरण लाड
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांचे वारे वाहू लागले असतानाच, नागोठणे जिल्हा परिषद गटात राजकीय हालचालींना वेग आला आहे. नागोठणे ‘केएमजी’ विभागातील प्रमुख सामाजिक कार्यकर्ते सुदाम घाग आणि संतोष वादळ यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेना (शिंदे गट) पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. राज्याचे मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रवेशामुळे नागोठणे परिसरात शिवसेनेची ताकद वाढली असून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
नामदार गोगावले यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
नागोठणे येथील एसटी बसस्थानक पुनर्विकास कामाचे भूमीपूजन आणि शिवसेना संपर्क कार्यालयाचे उद्घाटन मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून सुदाम घाग व संतोष वादळ यांनी भगवा हाती धरला. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे रोहा तालुका प्रमुख ॲड. मनोजकुमार शिंदे, उपतालुका प्रमुख मनोज खांडेकर, युवा उद्योजक सुमित काते, विभाग प्रमुख प्रविण ताडकर, शहर प्रमुख संतोष चितळकर, विभाग संघटक दिनेश घाग यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
अनुभवी नेतृत्वामुळे शिवसेनेला बळकटी
पक्षात प्रवेश केलेले सुदाम घाग हे ‘केएमजी’ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे माजी अध्यक्ष असून, श्री अष्टविनायक ग्रामीण बिगर सहकारी पतसंस्थेचे ते दीर्घकाळ संचालक राहिले आहेत. त्यांचा सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील दांडगा अनुभव शिवसेनेसाठी नागोठणे शहरात फायदेशीर ठरणार आहे. तसेच, संतोष वादळ यांनीही गणेशोत्सव मंडळाचे माजी सचिव म्हणून काम पाहिले असून, विभागात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे.
”शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमचे दैवत आहेत. नागोठणे विभागातील संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी आम्ही पक्षात प्रवेश केला आहे.”
— सुदाम घाग व संतोष वादळ
जिल्हा परिषद गटात बदलणार समीकरणे
नागोठणे जिल्हा परिषद मतदारसंघातील या मोठ्या ‘इनकमिंग’मुळे विरोधकांसमोर आव्हान उभे ठाकले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर प्रभावी कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे या गटात शिवसेनेचे पारडे जड झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे.
