उरण : अनंत नारंगीकर
जेएनपीए बंदर परिसर, सिडको आणि खाडी किनाऱ्यालगतच्या जमिनीवर बेकायदेशीर रित्या भराव टाकून सुरू करण्यात आलेले अनधिकृत पार्किंग आता गुन्हेगारीचे केंद्र बनू लागले आहे. परप्रांतीय भूमाफियांनी प्रशासनाला हाताशी धरून सुरू केलेल्या या पार्किंगमध्ये गुटखा, चरस आणि गांजा यांसारख्या अंमली पदार्थांची राजरोस विक्री होत आहे. या नशिल्या पदार्थांच्या विळख्यामुळे परिसरात बाचाबाची, वाहतूक कोंडी आणि भीषण अपघातांचे सत्र वाढले असून, संबंधित प्रशासनाने यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
सर्व्हिस रस्त्यांना पार्किंगचा विळखा
जेएनपीए परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी सिडको व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सहा पदरी रस्ते आणि सर्व्हिस रोडची निर्मिती केली आहे. मात्र, धुतूम, पागोटे आणि करळ ग्रामपंचायत हद्दीतील मोकळ्या भूखंडांवर दगड-मातीचा भराव टाकून अनधिकृत पार्किंगचे जाळे विणले गेले आहे. अधिकृत पार्किंगऐवजी वाहन चालक या बेकायदा तळांवर आणि सर्व्हिस रोडवर आपली अवजड वाहने उभी करत आहेत.
नशिल्या पदार्थांची विक्री अन् वाढते गुन्हे
या बेकायदा पार्किंगच्या ठिकाणी अंमली पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. वाहन चालक या पदार्थांचे सेवन करून वाहने चालवत असल्याने सर्वसामान्य प्रवाशांशी वादाचे प्रसंग घडत आहेत. नशेत असलेल्या चालकांमुळे अपघातांचे प्रमाणही धोकादायक पातळीवर पोहोचले आहे. विशेष म्हणजे, प्रशासकीय यंत्रणा या गंभीर बाबीकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.
जनआंदोलनाचा इशारा
गोदाम मालकांनी त्यांच्या वाहनांच्या पार्किंगचे नियोजन केल्यास रस्त्यावरील कोंडी फुटू शकते. मात्र, सिडको अतिक्रमण विभाग आणि संबंधित प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
”प्रत्येक गोदाम मालकाने आपल्या पार्किंगचे नियोजन केले, तर रस्त्यावर एकही वाहन उभे राहणार नाही. आज या बेकायदा पार्किंगमुळे अपघात आणि वाहतूक कोंडी होत आहे. प्रशासनाला हे सर्व दिसत असूनही ते डोळेझाक करत आहेत. जर हे तातडीने थांबले नाही, तर जनता रस्त्यावर उतरेल.”
— विजय भोईर (सदस्य, रायगड जिल्हा परिषद)
