दिघी पोर्टमध्ये स्थानिकांना रोजगारासाठी तांत्रिक शिक्षण सुरू करण्याचा मानस; सोनी विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
दिघी | गणेश प्रभाळे
“शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आपण जेव्हा विद्यार्थ्यांसाठी प्रामाणिकपणे आणि दर्जेदार काम करतो, तेव्हाच भविष्यातील सुदृढ आणि सक्षम पिढी घडते. सामाजिक बांधिलकी कशी जपावी, याचे उत्तम उदाहरण रवींद्र कुळकर्णी यांनी समाजासमोर ठेवले आहे,” असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री नामदार अदिती तटकरे यांनी केले. बोर्ली पंचतन येथील जनता शिक्षण संस्थेच्या श्री मोहनलाल सोनी विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनातील ‘विविध गुणदर्शन’ कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
दिघी पोर्ट व रोजगारावर भाष्य
आपल्या भाषणात ना. तटकरे यांनी स्थानिक रोजगारावर विशेष भर दिला. त्या म्हणाल्या की, “दिघी पोर्ट विकसित होत असताना त्या ठिकाणी स्थानिकांना प्राधान्याने रोजगार मिळायला हवा, ही आमची आग्रही भूमिका आहे. केवळ नोकरी मिळवणे पुरेसे नाही, तर त्यासाठी आवश्यक तांत्रिक शिक्षण असणे गरजेचे आहे. त्यामुळेच मेरिटाईम, पोर्ट विकास, उच्च व तंत्रशिक्षण आणि कौशल्य विकास विभागाच्या समन्वयातून या भागात पोर्ट संबंधित विशेष कोर्सेस सुरू करण्याचा आमचा मानस आहे.”
श्री मोहनलाल सोनी विद्यालय व श्री नानासाहेब कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे सन २०२५-२६ चे स्नेहसंमेलन १० डिसेंबरपासून मोठ्या उत्साहात सुरू होते. १० ते १२ डिसेंबर आंतरशालेय क्रीडा स्पर्धा, १३ डिसेंबर रांगोळी व हस्तकला प्रदर्शन, १५ डिसेंबर वार्षिक पारितोषिक वितरण, १६ डिसेंबर आनंद मेळावा, १७ डिसेंबर रोजी ना. आदिती तटकरे यांच्या हस्ते विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे उदघाटन पार पडले.
सामाजिक दातृत्वाचा सन्मान
यावेळी ना. तटकरे यांनी रवींद्र कुळकर्णी यांचे विशेष कौतुक केले. कुळकर्णी यांनी यापूर्वी श्रीवर्धन क्रीडा संकुलासाठी १ एकर (१०० गुंठे) जमीन विनामूल्य दिली असून, आता सुसज्ज रुग्णालयासाठी देखील जमीन देण्याचा त्यांचा मानस आहे. या कार्यक्रमात डॉ. राजेश पाचारकर, आशीर्वाद फाउंडेशनचे राजेश चव्हाण, सेवानिवृत्त कर्मचारी महादेव गायकर आणि प्रकाश पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
’सिनीअर कॉलेज’साठी प्रयत्न करणार
संस्थेचे प्रभारी कार्याध्यक्ष महंमद मेमन यांनी आपल्या प्रास्ताविकात विद्यालयात ‘सिनीअर कॉलेज’ सुरू करण्याची आणि गावासाठी सुसज्ज रुग्णालयाची मागणी केली. यावर सकारात्मक प्रतिसाद देत ना. तटकरे यांनी सिनीअर कॉलेजसाठी निश्चित पावले उचलली जातील, असे आश्वासन दिले.
या सोहळ्याला जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रवींद्र कुळकर्णी, सचिव अनंत भायदे, खजिनदार उदय बापट, संचालक रमेश घरत, निशांत मोरे, गणेश पाटील, मंदार तोडणकर, श्रीकांत तोडणकर, कुमार गाणेकर, रत्नाकर पाटील, प्रकाश जैन, विष्णू धुमाळ, अनिल पवार, ऋषिकांत गायकर, सचिन कीर, पोलीस पाटील उद्देश वागजे, प्राचार्य बाबासाहेब यळमंते, उपप्राचार्य नमिता नागवेकर, पर्यवेक्षक रमझान पठाण यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
