धनशक्ती विरुद्ध जनशक्तीच्या लढाईत गुलाल कुणाचा? राजकीय भवितव्याचा फैसला काही तासांत
महाड | मिलिंद माने
रायगड जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे आणि सर्वसामान्यांचे लक्ष लागून राहिलेल्या कर्जत, अलिबाग, माथेरान, मुरुड, श्रीवर्धन, खोपोली, उरण, पेण, महाड आणि रोहा या दहा नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल उद्या, २१ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. २ डिसेंबर रोजी पार पडलेल्या मतदानानंतर उद्या सकाळी मतमोजणीला सुरुवात होणार असून, दुपारी १२ वाजेपर्यंत जिल्ह्याचे नवे राजकीय चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
बदललेली राजकीय समीकरणे
मागील निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष एकसंध होते. मात्र, यंदाच्या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि भाजपा विरुद्ध शेकाप व उद्धव ठाकरे गट अशी चुरस पाहायला मिळत आहे. गेल्या निवडणुकीत प्रभाव नसलेली भाजपा या वेळी किती मुसंडी मारते आणि फुटीमुळे चर्चेत असलेला शेकाप आपले अस्तित्व टिकवून धरतो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. या निकालावरच आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे गणित अवलंबून असणार आहे.
मतदानाची सांख्यिकी एका दृष्टिक्षेपात
जिल्ह्यातील १० नगरपरिषदांमध्ये सरासरी ६६% ते ८५% मतदान झाले असून, माथेरानमध्ये सर्वाधिक ८५.३५% तर श्रीवर्धनमध्ये सर्वात कमी ६६.२३% मतदान नोंदवले गेले आहे.
| नगरपरिषद | एकूण मतदान | झालेले मतदान | टक्केवारी |
|---|---|---|---|
| कर्जत | २१,९५७ | २१,६८० | ७२.३७% |
| अलिबाग | १६,३५४ | ११,४९८ | ७०.३१% |
| माथेरान | ४,०५५ | ३,४६१ | ८५.३५% |
| मुरुड | ११,५४४ | ८,५३० | ७३.८९% |
| श्रीवर्धन | १२,६३७ | ८,३७० | ६६.२३% |
| खोपोली | ६२,०७४ | ४२,५३५ | ६८.५२% |
| उरण | २६,२१४ | १७,८०५ | ६७.९२% |
| पेण | ३३,८७५ | २३,८४५ | ७०.३९% |
| महाड | २३,१२४ | १६,४२४ | ७१.०३% |
| रोहा | १७,६६९ | १२,७०८ | ७१.९२% |
कडेकोट पोलीस बंदोबस्त
निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. राज्य राखीव पोलीस दलाच्या (SRPF) तुकड्या आणि होमगार्डना पाचारण करण्यात आले आहे. संवेदनशील ठिकाणी मिरवणुका, फटाकेबाजी आणि गुलाल उधळण्यावर निर्बंध घालण्यात आले असून, बाहेरून येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.
कार्यकर्त्यांची तयारी तरीही जोरात
प्रशासनाने निर्बंध लावले असले, तरी विजयाची खात्री असलेल्या उमेदवारांनी निकालापूर्वीच जल्लोषाची तयारी केली आहे. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी बँड पथके, बँजो, फटाके आणि फुलांचे हार तयार ठेवले आहेत.
जिल्ह्यात ‘धनशक्ती’ जिंकते की ‘जनशक्ती’, तसेच प्रस्थापित पक्षांना धक्का बसणार की नवीन राजकीय समीकरणे आकाराला येणार, याचे उत्तर उद्या मिळणार आहे.
