हाऊस फुल्ल गर्दीत बोट चालकांची मनमानी
दिघी मेरीटाईम बोर्डाचे जलवाहतूक कारभाराकडे दुर्लक्ष
दिघी । गणेश प्रभाळे
श्रीवर्धन, मुरुड या दोन तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळाला जोडणाऱ्या दिघी जलवाहतूकीची प्रवासी सेवा वेळेच्या बंधनात अडकली आहे. ऐन नववर्ष पर्यटन हंगामाच्या हाऊस फुल गर्दीत अपुऱ्या सेवेने प्रवाशांची रखडपट्टी होत आहे.
दिघी ते आगरदांडा या जल मार्गावर दोन बोटीतून होणारा प्रवास आता खोळंबला आहे. दिघी येथे अधिकृत जलवाहतूक करणाऱ्या सुवर्ण शिपिंग मरीन सर्व्हिसेस आणि दिघी जलवाहतूक संस्था अशा दोन फेरी बोटितून सेवा दिली जात आहे. या व्यवस्थेकडून वेळेनुसारच बोट सोडण्याच्या हट्टापाय प्रवाशी या तुडुंब गर्दीत सुविधांची मागणी करत आहे.
दिघी ते आगरदांडा येथून सुरू होणारा प्रवास सकाळी आठ वाजताच्या फेरी बोटने नियमित सुरू होतो. या वेळेच्या नुसार दिवसभर तास व दीड तासाच्या अंतरात दोन्ही ठिकाणाहून नागरिकांना येण्या जाण्यासाठी प्रवासाची तयारी करावी लागते. मात्र, आता पर्यटन हंगामात पर्यटकांची संख्या वाढत असल्याने बोट चालकाने जादा फेरी मारून सेवा देण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
आगरदांडा व दिघी बंदर हे दोन महत्वाचे बंदर आहेत. श्रीवर्धन, म्हसळा, मुरुड या तीन तालुक्याला जोडणारा जलमार्ग हा महत्वाचा दुवा आहे. त्यामुळे येथे दिवेआगर, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, मुरूड, अलिबाग आदी नयनरम्य ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढती आहे. यामधून पर्यटन व्यवसायाच्या वाढीसाठी उपयुक्त ठरणारी जंगल जेटीची निर्मिती करण्यात आली. मात्र, बोट चालकांकडून सेवा मिळत नसल्याने प्रवाशांमध्ये संताप पाहायला मिळत आहे.
आगरदांडा व दिघी बंदर येथून होणारी जलवाहतूक नेहमीच्या वेळेत करण्यासाठी प्रवाशांना ताटकळत ठेऊ नका. सध्याच्या पर्यटन हंगामातील प्रवाशाची संख्या पाहून बोट व्यवस्थेकडून जास्तीत जास्त सुविधा देण्यात यावी.
-सुकुमार तोंडलेकर,
माजी सभापती.
