• Sun. Dec 21st, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

धुतुममधील इंडियन ऑईल टँकिंग कंपनीला सिडकोचा दणका; ५४७ कोटींचा दंड ७ दिवसांत भरण्याचे आदेश

ByEditor

Dec 20, 2025

आमदार नाना पटोले यांनी विधानसभेत प्रश्न उचलल्यानंतर सिडकोला जाग; कायदेशीर कारवाईचा इशारा

उरण । विठ्ठल ममताबादे
उरण तालुक्यातील धुतुम येथील द्रोणागिरी नोडमधील इंडियन ऑईल टँकिंग लिमिटेड या कंपनीने गेल्या अनेक वर्षांपासून भुईभाड्यापोटी थकविलेले तब्बल ५४७ कोटी रुपये सात दिवसांच्या आत भरण्याचे आदेश सिडकोने दिले आहेत. विहित मुदतीत ही रक्कम न भरल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही सिडकोने नोटिशीद्वारे दिला आहे.

२९ वर्षांपासून थकीत महसूल

धुतुम ग्रामपंचायतीच्या हद्दीतील द्रोणागिरी नोड, सेक्टर-१ मधील प्लॉट क्र. १०१ वर हा प्रकल्प १७ ऑक्टोबर १९९६ रोजी भुईभाड्याने देण्यात आला होता. १९९६ पासून या ठिकाणी जेएनपीए बंदरातून आयात होणाऱ्या तेलजन्य पदार्थांच्या साठवणुकीसाठी मोठ्या टाक्या उभारण्यात आल्या आहेत. मात्र, सुरुवातीपासूनच या भूखंडाचे भाडे भरण्यास कंपनीने टाळाटाळ केली होती. या थकबाकीमध्ये प्रशासकीय खर्च, जीएसटी, दिरंगाई शुल्क आणि सेवा शुल्काचा समावेश असून एकूण आकडा ५४७ कोटींवर पोहोचला आहे.

सामाजिक कार्यकर्त्याचा १५ वर्षांचा लढा

कंपनीने मंजूर आराखड्याप्रमाणे बांधकाम न करणे आणि भोगवटा प्रमाणपत्र (OC) न घेणे यांसारख्या गंभीर त्रुटी रांजणपाडा येथील सामाजिक कार्यकर्ते राम दशरथ पाटील यांनी उजेडात आणल्या होत्या. गेल्या १५ वर्षांपासून ते सिडको, जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्याकडे यासंदर्भात तक्रारी करत होते. मात्र, शासकीय यंत्रणा याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.

विधानसभेत गाजले प्रकरण

प्रशासकीय स्तरावर कारवाई होत नसल्याने राम पाटील यांनी हे प्रकरण आमदार नाना पटोले यांच्या निदर्शनास आणून दिले. पटोले यांनी विधानसभेत या घोटाळ्याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केल्यानंतर सिडको प्रशासनाला जाग आली आणि तातडीने ५४७ कोटी रुपयांची वसुली नोटीस बजावण्यात आली.

सिडकोच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

राज्याच्या तिजोरीत महसूल जमा होणे आवश्यक असताना, इतक्या वर्षांपासून ५४७ कोटींची रक्कम थकीत राहणे हा सिडको अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा आहे की कंपनीशी असलेले ‘अर्थपूर्ण’ संबंध, अशी चर्चा आता नागरिकांमध्ये रंगली आहे. आता सात दिवसांच्या मुदतीत कंपनी ही रक्कम भरते की सिडकोला कठोर पावले उचलावी लागतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!