माजी कसोटीपटू दिलीप वेंगसरकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन
महाराष्ट्र आणि गोव्यातील १०० संघांची रणधुमाळी; रायगडच्या वकिलांना विजयाचा विश्वास
रायगड (क्रीडा प्रतिनिधी): महाराष्ट्र आणि गोवा बार असोसिएशनच्या वतीने आयोजित मानाच्या ‘स्टेट लेव्हल ॲडव्होकेट प्रीमियर लीग’ (टी-२० क्रिकेट स्पर्धा) साठी अलिबागचा ‘सी-हॉक्स’ संघ नाशिक येथे दिमाखात रवाना झाला आहे. नाशिक आणि अमरावती जिल्हा वकील संघटनेच्या यजमानपदाखाली होणाऱ्या या भव्य स्पर्धेत अलिबागच्या वकिलांचे कौशल्य पणाला लागणार आहे.
स्पर्धेचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये
नाशिक येथील संदीप युनिव्हर्सिटीच्या मैदानावर शनिवार, २० डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता माजी भारतीय क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांच्या हस्ते स्पर्धेचा शानदार उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. ३१ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत महाराष्ट्र आणि गोवा राज्यातून तब्बल १०० संघ सहभागी झाले आहेत. लेदरचा पांढरा चेंडू आणि खेळाडूंचे आकर्षक रंगीत गणवेश हे या स्पर्धेचे मुख्य आकर्षण असून, सामने प्रथम साखळी आणि त्यानंतर बाद (Knockout) फेरी पद्धतीने खेळवले जाणार आहेत.
अलिबाग ‘सी-हॉक्स’ संघ खालीलप्रमाणे:
संघाचे नेतृत्व अनुभवी ॲड. समीर बंगाली करत असून उपकर्णधारपदाची धुरा ॲड. मनीष पाटील सांभाळत आहेत.
संघ: ॲड. महेश म्हात्रे, ॲड. प्रशांत गावंड, ॲड. प्रशांत म्हात्रे, ॲड. गौतम पाटील, ॲड. राहुल मोरे, ॲड. अभिलाष मोरे, ॲड. स्नेहेंद्र पवार, ॲड. गौरव लेले, ॲड. कौस्तुभ पुनकर, ॲड. ऋषिकेश माळी, ॲड. हर्षल पाटील, ॲड. रोहित भोईर, ॲड. विशाल जाधव, ॲड. विश्वेश पिकळे, ॲड. राहुल पाटील.
यष्टिरक्षक: ॲड. पंकज पंडित आणि ॲड. ऋग्वेद ठाकूर.
मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्यासाठी मुंबई, नागपूर आणि संभाजीनगर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याचे अध्यक्ष, पदाधिकारी तसेच विविध जिल्ह्यांतील वकील संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
कोर्टाच्या मैदानात प्रभावी युक्तिवाद गाजवणारे रायगडचे वकील आता क्रिकेटच्या मैदानावर चौकार-षटकारांची आतिषबाजी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. अलिबाग व रायगड वकील संघटनेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी संघाला विजयासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
