• Fri. Mar 13th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

गेलची पाईपलाईन कुणासाठी सुरक्षित आणि कुणासाठी जीवघेणी? पेणच्या तेरा गावांचा लोकप्रतिनिधींना संतप्त सवाल

ByEditor

Jan 8, 2026

​आमचे जीव इतके स्वस्त झाले आहेत का? ‘गेल’ बाधितांचा सरकारला जाब; समुद्रमार्गे पाईपलाईन नेण्याची मागणी

​पेण | प्रतिनिधी
पेण तालुक्यातील तेरा गावांमधून गेल (GAIL) कंपनीची द्रवरूप प्रोपेन वायूची (Liquefied Propane Gas) पाईपलाईन नेण्याचा घाट घातला जात असल्याने स्थानिक जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे. “हा प्रकल्प नेमका कुणासाठी सुरक्षित आणि कुणासाठी जीवघेणी?” असा थेट सवाल पेणच्या तेरा गावांतील नागरिकांनी लोकप्रतिनिधींना विचारला असून, विकासाच्या नावाखाली आमच्या जीवावरचा हा जुगार थांबवा, अशी आक्रमक भूमिका घेतली आहे.

सुपीक जमीन आणि मानवी वस्तीला धोका

​अत्यंत ज्वलनशील आणि स्फोटक असलेला हा वायू सुपीक शेतजमीन, सिंचन क्षेत्र, शाळा, वाड्या-वस्त्या आणि जलस्रोतांच्या अगदी जवळून नेला जात आहे. “राष्ट्रीय हित” म्हणून या प्रकल्पाचे समर्थन केले जात असले तरी, कंपन्यांच्या नफ्यासाठी सामान्य माणसाचा बळी दिला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

​लोकप्रतिनिधींच्या भूमिकेकडे लक्ष

​या प्रश्नावरून पेणमधील जनतेने रायगडच्या प्रमुख लोकप्रतिनिधींच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे:

​खासदार सुनील तटकरे: पेट्रोलियम व नैसर्गिक वायू संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष असतानाही, त्यांनी या प्रकल्पाचे धोके ओळखून पाईपलाईन समुद्रमार्गे किंवा औद्योगिक कॉरिडॉरमधून वळवण्यासाठी प्रयत्न का केले नाहीत? असा प्रश्न विचारला जात आहे.

​खासदार धैर्यशील पाटील: पेणचे सुपुत्र आणि सत्ताधारी पक्षात वजन असूनही, जनतेच्या सुरक्षेसाठी केंद्रावर दबाव टाकण्यात ते कमी पडत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.

​आमदार रवींद्र पाटील: मतदारसंघातील जनतेने दोनवेळा भरघोस मतांनी निवडून दिल्यानंतरही, या जीवघेण्या प्रकल्पाविरोधात आमदार ठामपणे उभे का राहत नाहीत? उद्या दुर्घटना घडल्यास जबाबदारी कोणाची? असा सवाल मेधा विजय म्हात्रे यांनी उपस्थित केला आहे.

​”हा विकास नव्हे, तर लादलेला धोका”

ग्रामसभांचे ठराव आणि शेतकऱ्यांचा लेखी विरोध डावलून हा प्रकल्प रेटला जात असल्याने लोकशाहीच्या मूल्यांवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. स्थानिक जनतेचे म्हणणे आहे की, त्यांचा विरोध विकासाला नसून ‘जीवन विरोधी’ विकासाला आहे. समुद्रमार्गे पाईपलाईन नेण्याचा तांत्रिक पर्याय उपलब्ध असतानाही केवळ वस्ती आणि शेतीची निवड का केली जात आहे, याचे उत्तर प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडे नाही.

​”आमचे जीव धोक्यात घालून कोणताही प्रकल्प आम्हाला मान्य नाही. आज लोकप्रतिनिधी गप्प राहिले, तर उद्या जनतेला रस्त्यावर उतरून जाब विचारावा लागेल. हा प्रश्न केवळ रस्ता-पाण्याचा नाही, तर आमच्या अस्तित्वाचा आणि जिवंत राहण्याचा आहे.”
— मेधा विजय म्हात्रे (वाशी, पेण),
गेल बाधित शेतकरी प्रतिनिधी.

​या संघर्षामुळे पेण तालुक्यातील तेरा गावांमध्ये सध्या तणावाचे वातावरण असून, येत्या काळात हा लढा अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!