प्रशासनाच्या आशीर्वादाने डेब्रिज माफिया सक्रिय? ८ दिवसांत कारवाई न झाल्यास जनआंदोलनाचा इशारा
उरण | घन:श्याम कडू
जुन्या मुंबई शहरातून अनधिकृतपणे उचललेला बांधकामाचा ढिगारा (डेब्रिज), प्लास्टिक, रासायनिक कचरा आणि कुजलेली घाण थेट उरण पोलीस ठाण्याच्या हद्दीत डंप केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या बेकायदेशीर कृत्यामुळे उरण तालुक्यातील अनेक गावांचे आरोग्य धोक्यात आले असून परिसरात तीव्र दुर्गंधी व साथीच्या आजारांचे सावट पसरले आहे.

गावागावात कचऱ्याचे साम्राज्य
मिळालेल्या माहितीनुसार, उरणमधील दास्तान फाटा, चिरले, जांभुळपाडा, गावठाण, दादरपाडा आणि दिघोडे परिसरात मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जात आहे. यामुळे स्थानिक जलस्रोत दूषित झाले असून नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. रात्रीच्या अंधारात डंपरद्वारे हा कचरा टाकला जातो. या गाड्यांचे मार्ग आणि ठिकाणे माहीत असूनही पोलीस, महसूल व संबंधित प्रशासन कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

अजित म्हात्रे यांची कारवाईची मागणी
या प्रकरणाची गंभीर दखल घेत उरणचे सामाजिक कार्यकर्ते अजित कृष्णा म्हात्रे यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त, तहसीलदार, सिडको आणि वाहतूक विभागाकडे वारंवार निवेदने देऊन उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. मात्र, प्रशासनाकडून अद्याप कोणतीही कठोर पावले उचलली गेलेली नाहीत. “उरण म्हणजे मुंबईची कचरापेटी नाही. डेब्रिज माफियांना कोणाचा आशीर्वाद आहे? अधिकारी यात सहभागी आहेत का?” असा सवाल म्हात्रे यांनी उपस्थित केला आहे.
धमक्यांचे सत्र आणि आंदोलनाचा इशारा
विशेष म्हणजे, या अवैध धंद्याविरोधात आवाज उठवणाऱ्या कार्यकर्त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा गंभीर आरोपही म्हात्रे यांनी केला आहे. प्रशासनाने पुढील ८ दिवसांत हे डंपिंग न थांबवल्यास आणि दोषींवर गुन्हे दाखल न केल्यास हजारो नागरिकांसह ‘जनआक्रोश आंदोलन’ छेडले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
आता उरणच्या जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या माफियांवर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर शासन काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
