वासराची शिकार केल्याने घबराट; पिंजरा लावण्याची सापे ग्राम विकास मंडळाची वनविभागाकडे मागणी
महाड | मिलिंद माने
महाड तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील सापे तर्फे गोवेले परिसरात बिबट्याचा मुक्त संचार वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मागील काही दिवसांपासून या परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून, नुकतीच एका वासराची शिकार केल्याची घटना समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर, बिबट्याला जेरबंद करण्यासाठी सापे ग्राम विकास मंडळाने महाडच्या वनक्षेत्रपालांना लेखी निवेदन दिले आहे.
गावाच्या विहिरीपाशी बिबट्यांचे दर्शन सापे तर्फे गोवेले हे गाव सावित्री खाडीच्या किनाऱ्यावर आणि राखीव जंगलाला लागून असल्याने या ठिकाणी हिंस्त्र श्वापदांचा वावर नैसर्गिक आहे. मात्र, गेल्या दोन-तीन दिवसांपासून गावाच्या विहिरी आणि तलावाच्या परिसरात बिबट्यांचा वावर लक्षणीय वाढला आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या परिसरात तब्बल तीन बिबटे सक्रिय असून त्यांनी एका गाईच्या वासराचा फडशा पाडला आहे.
मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न बिबट्याच्या दहशतीमुळे ग्रामस्थ दिवसाढवळ्या घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत. विशेषतः शाळेत जाणारी मुले, कॉलेजचे तरुण आणि घरगुती कामासाठी बाहेर पडणाऱ्या महिलांच्या मनात भीतीचे सावट आहे. “बिबट्या कधीही मानवी वस्तीवर हल्ला करू शकतो, त्यामुळे नागरिकांच्या जीविताला मोठा धोका निर्माण झाला आहे,” असे ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे.
वनविभाग अलर्ट मोडवर
सापे ग्राम विकास मंडळाने वनक्षेत्रपाल आशिष पाटील यांना दिलेल्या निवेदनात तातडीने कॅमेरे आणि पिंजरे लावण्याची मागणी केली आहे. जर वेळीच खबरदारी घेतली नाही आणि एखादी जीवितहानी झाली, तर त्याला पूर्णपणे वनविभाग जबाबदार राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.
“गावातील तक्रारीची दखल घेऊन वनविभागाचे पथक अलर्ट मोडवर आले आहे. बिबट्याला पकडण्यासाठी रात्रीची गस्त सुरू करण्यात येत असून, पिंजरा नेमका कुठे लावायचा याची पडताळणी कर्मचाऱ्यांमार्फत केली जात आहे.”
-आशिष पाटील,
वनक्षेत्रपाल, महाड
