मर्यादित सुविधांवर मात करत विद्यार्थ्यांनी पटकावला द्वितीय क्रमांक; सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव
श्रीवर्धन | अनिकेत मोहित
कल्याण येथील खडवली येथे पार पडलेल्या मुंबई विभागस्तरीय शालेय आट्या-पाट्या क्रीडा स्पर्धेत श्रीवर्धनच्या रवींद्र ना. राऊत माध्यमिक विद्यालयाने घवघवीत यश संपादन केले आहे. या स्पर्धेत विद्यालयाच्या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत द्वितीय क्रमांक पटकावला असून श्रीवर्धन तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
मैदानावर गाजवले वर्चस्व भारतीय सैनिकी विद्यालय, खडवली (ता. कल्याण) येथे ६ आणि ७ जानेवारी २०२६ रोजी ही स्पर्धा पार पडली. ६ जानेवारी रोजी मुलींच्या, तर ७ जानेवारी रोजी मुलांच्या गटातील सामने झाले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यांमध्ये रवींद्र ना. राऊत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चपळता आणि संघभावनेच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघांना कडवी झुंज दिली आणि उपविजेतेपद आपल्या नावावर केले.
जिद्द आणि चिकाटीचे फळ विशेष म्हणजे, सरावासाठी मर्यादित सुविधा आणि अत्यंत कमी कालावधी उपलब्ध असतानाही विद्यार्थ्यांनी दाखवलेली मेहनत आणि जिद्द कौतुकास्पद ठरली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मुंबई विभागासारख्या मोठ्या स्तरावर मिळवलेल्या या यशामुळे क्रीडा क्षेत्रात त्यांचे विशेष कौतुक होत आहे.
सहकार्याबद्दल मानले आभार या यशात शाळेचे संचालक मंडळ, शिक्षकवृंद आणि प्रशिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच, श्रीवर्धन शहर भूमिपुत्र संघटनेने दिलेल्या विशेष सहकार्याबद्दल खेळाडू, पालक व शिक्षकांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. या यशामुळे भविष्यातही हे खेळाडू राज्य व राष्ट्रीय स्तरावर श्रीवर्धनचे नाव उज्वल करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. यशस्वी खेळाडूंचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
