रायगड | प्रतिनिधी
पुण्याहून महाबळेश्वरला फिरायला गेलेल्या २२ वर्षीय तरुणाची त्याच्याच मित्रांनी पैशांच्या वादातून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ताम्हिणी घाटातील सणसवाडी गावच्या हद्दीत हे हत्याकांड घडले. रायगडच्या माणगाव पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास करत अवघ्या ८ तासांत दोन आरोपींना अटक केली आहे.
नेमकी घटना काय?
पुण्यातील भोसरी येथील आदित्य गणेश भगत (वय २२) हा आपल्या अनिकेत वाघमारे, तुषार पोटोळे आणि प्रज्वल हंबीर या तीन मित्रांसोबत इनोव्हा कारने महाबळेश्वरला सहलीसाठी निघाला होता. प्रवासादरम्यान त्यांच्यात जुन्या पैशांच्या व्यवहारावरून जोरदार वाद झाला. हा वाद इतका वाढला की, मित्रांनी धावत्या गाडीतच दोरीने आदित्यचा गळा आवळला.
’सिक्रेट पॉईंट’वर थरार
गळा आवळल्यानंतर आरोपींनी ताम्हणी घाटातील सणसवाडी गावच्या हद्दीत ‘सिक्रेट पॉईंट’ जवळ गाडी थांबवली. तेथे आदित्यला ओढत बाहेर नेऊन त्याच्यावर कोयत्याने वार करण्यात आले. डोक्यावर, मानेवर आणि हातावर सपासप वार करून त्याची हत्या केल्यानंतर, आरोपींनी मृतदेह तिथेच झुडपात फेकून दिला आणि घटनास्थळावरून पळ काढला.
पोलिसांनी असा लावला छडा
११ जानेवारी २०२६ रोजी रात्री उशिरा पोलिसांना मृतदेह आढळल्यानंतर तपासाची चक्रे फिरली. सुरुवातीला मृतदेहाची ओळख पटत नव्हती. रायगड पोलिसांनी पुणे शहर आणि ग्रामीण नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून बेपत्ता तरुणांची माहिती मिळवली. सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपींचा माग काढला. माणगाव पोलिसांनी अवघ्या ६ ते ८ तासांत दोन मुख्य आरोपींना बेड्या ठोकल्या.
या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम १०३(१) अन्वये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मित्रच मित्राच्या जीवावर उठल्याच्या या प्रकारामुळे पुणे आणि रायगड परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
