अलिबाग । विशेष प्रतिनिधी
कर्तृत्वाला वयाचे आणि परिस्थितीचे बंधन नसते, हे अलिबागच्या जिविता पाटील यांनी सिद्ध केले आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी ‘एलएलएम’ (LLM – मास्टर ऑफ लॉ) ही कायद्यातील पदव्युत्तर पदवी प्रथम श्रेणीत संपादन केली आहे. विशेष म्हणजे, कायदा विषयात पदव्युत्तर पदवी मिळवणाऱ्या त्या महाराष्ट्रातील पहिल्या अंगणवाडी सेविका ठरल्या आहेत. त्यांच्या या सुवर्ण यशाबद्दल संपूर्ण राज्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
संघर्षातून यशाकडे…
जिविता पाटील यांचा जीवनप्रवास अत्यंत खडतर राहिला आहे. वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी पतीचे छत्र हरपले. पदरात एक वर्षाचे मूल आणि भविष्याचा अंधकार समोर असताना, त्यांनी सासू मनोरमा पाटील यांच्या खंबीर पाठिंब्यावर शिक्षणाचा श्रीगणेशा पुन्हा केला. घर चालवण्यासाठी त्यांनी भाजी विकण्यापासून ते पतसंस्थेत खाती गोळा करण्यापर्यंतची सर्व कामे केली.
शैक्षणिक वाटचालीतील ‘सुवर्णपान’
जिवीता पाटील यांचा शैक्षणिक प्रवास थक्क करणारा आहे:
२०११ मध्ये त्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेत अंगणवाडी सेविका म्हणून रुजू झाल्या. नोकरी सांभाळून त्यांनी शिक्षणाची जिद्द कायम ठेवली.
प्रारंभीचे शिक्षण: एम.ए., बी.एड आणि एम.ए. एज्युकेशन या पदव्या प्राप्त केल्या.
समाजकार्य: ‘एम.एस.डब्ल्यू’ पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली. ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी समाजकार्यात स्वतःला झोकून दिले.
विधी शिक्षण: समाजव्यवहारातील अन्यायाची जाणीव झाल्यावर त्यांनी अलिबागच्या ॲड. दत्ता पाटील लॉ कॉलेजमधून ‘एलएलबी’ पूर्ण केले.
‘एलएलएम’मध्ये प्रथम श्रेणी आणि बहुमान
कायद्याचा सखोल अभ्यास करण्यासाठी त्यांनी सीईटी (CET) परीक्षेद्वारे पनवेलच्या भागुबाई चांगू ठाकूर (BCT) लॉ कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला. प्राचार्य डॉ. सानवी देशमुख व त्यांच्या टीमच्या मार्गदर्शनाखाली जिविता यांनी दोन वर्षांचा एलएलएम अभ्यासक्रम पूर्ण केला. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात त्यांनी प्रथम श्रेणी पटकावून नवा इतिहास रचला आहे.
समाजाचा दृष्टिकोन बदलण्यासाठी ‘कायदा’
“अंगणवाडी सेविकांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन आजही बदललेला नाही, याची खंत वाटते. परिस्थितीची जाणीव नसलेले लोक जेव्हा तुच्छतेने पाहतात, तेव्हा शिक्षणाशिवाय पर्याय नसल्याचे मला जाणवले,” अशा शब्दांत जिविता पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
सध्या त्या ‘डिप्लोमा इन कौन्सिलिंग’चा अभ्यास करत असून, भविष्यात आपल्या ज्ञानाचा उपयोग पीडित महिला आणि वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी करण्याचा त्यांचा मानस आहे. एका एकल महिलेने आणि अंगणवाडी सेविकेने मिळवलेले हे यश राज्यातील लाखो महिलांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.
