• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

​पेण: कांदळे तलाठ्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई; ५ हजारांची लाच मागितल्याप्रकरणी ताब्यात

ByEditor

Jan 12, 2026

​पेण | विनायक पाटील
जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर वारसांची नावे नोंदवण्यासाठी ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या कांदळे येथील तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) ताब्यात घेतले आहे. महादेव सीताराम धुमाळ (वय ३४) असे या लोकसेवकाचे नाव असून, त्याच्यावर रायगड-अलिबाग एसीबीने ही कारवाई केली आहे.

​नेमकी घटना काय?

​तक्रारदार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची नावे मौजे कांदळे येथील सर्व्हे नं. ८९ या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर नोंदवण्यासाठी आरोपी महादेव धुमाळ याने ५ हजार रुपयांची मागणी केली होती. ही लाच त्याने स्वतःसाठी आणि मंडळ अधिकाऱ्यासाठी मागितल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी तक्रारदाराने २२ डिसेंबर २०२५ रोजी अलिबाग एसीबीकडे तक्रार दाखल केली होती.

​पडताळणीत गुन्हा निष्पन्न

​एसीबीने पंच साक्षीदारांच्या उपस्थितीत केलेल्या पडताळणी दरम्यान २२ डिसेंबर रोजी सायंकाळी ६:०६ ते ६:२३ या दरम्यान आरोपीने फोनवरून लाचेचा आग्रह धरला. ​त्याच दिवशी सायंकाळी ७:०३ ते ७:४२ च्या सुमारास उपविभागीय अधिकारी (SDO) कार्यालयाबाहेर झालेल्या प्रत्यक्ष भेटीत ५ हजार रुपये स्वीकारण्यास त्याने संमती दर्शवल्याची बाब समोर आली. ​या पुराव्यांच्या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धुमाळ विरोधात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

​ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनवणे व सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये पोलीस उप अधीक्षक सरिता आय. एस. भोसले, पोलीस निरीक्षक निशांत धनवडे, उपनिरीक्षक विनोद जाधव आणि अंमलदार महेश पाटील, परम ठाकूर, सुमित पाटील व सागर पाटील यांचा समावेश होता.

कोणत्याही शासकीय कामासाठी लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी तात्काळ ‘अॅन्टी करप्शन ब्युरो’शी संपर्क साधावा, असे आवाहन विभागातर्फे करण्यात आले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!