नागोठणे (प्रतिनिधी): आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजण्याची शक्यता लक्षात घेता, नागोठणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने रविवारी (११ जानेवारी) भव्य संघटन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ६ वाजता बाजारपेठ हॉलसमोरील मोदी ग्राउंड येथे हा मेळावा संपन्न होणार असून, याद्वारे भाजप नागोठणे शहरात शक्तीप्रदर्शन करणार आहे.
या मेळाव्याला भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील, आमदार रवीशेठ पाटील, ज्येष्ठ नेते सतीश धारप, महिला जिल्हाध्यक्षा चित्राताई पाटील, आस्वाद पाटील, महामंत्री वैकुंठ पाटील, मारुती देवरे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच जिल्हा उपाध्यक्ष सोपान जांभेकर, श्रेया कुंटे, अनंत वाघ, माधव मोहिते, महेश ठाकूर यांसह अनेक दिग्गज नेते मार्गदर्शन करणार आहेत.
भाजप हा जगातील सर्वात मोठा पक्ष असून नागोठणे शहरात विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि कार्यकर्त्यांची मोठी फळी कार्यरत आहे. या सर्व कार्यकर्त्यांना एकत्रित करून आगामी निवडणुकांसाठी भक्कम संघटन उभारणे, हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश असल्याचे भाजप शहराध्यक्ष सचिन मोदी यांनी सांगितले. या मेळाव्याला शहरातील बूथ अध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्यात पक्षाचे वरिष्ठ नेते काय रणनीती आखतात आणि कार्यकर्त्यांना कोणता कानमंत्र देतात, याकडे संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
