श्रीवर्धन । अनिकेत मोहित
श्रीवर्धन तालुक्यात प्रतिबंधित गोवंशीय मांसाची विक्रीच्या उद्देशाने वाहतूक करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. श्रीवर्धनमधील भट्टीचामाळ विभागात मुख्य रस्त्यालगत ही कारवाई करण्यात आली असून, पोलिसांनी ८५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शौकत गुलाम काझी (वय ५६ वर्षे, रा. आसिफ कॉम्प्लेक्स, श्रीवर्धन) हा आपल्या स्कूटीवरून प्रतिबंधित मांस विक्रीसाठी घेऊन जात असताना पोलिसांनी ही कारवाई केली. तपासादरम्यान आरोपीकडून ३५ किलो वजनाचे गोवंशीय मांस जप्त करण्यात आले असून त्याची किंमत १० हजार ५०० रुपये आहे. या कारवाईत पोलिसांनी मांस, एक हिरवी स्कूटी आणि एक लाल रंगाची टीव्हीएस एन. टॉर्क स्कूटी (क्रमांक: MH 06 CM 9836) असा एकूण ८५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी फिर्यादी तुषार आठरे यांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध पशूसंरक्षण अधिनियम १९९५ च्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. श्रीवर्धन शहरात बेकायदेशीर मांस विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला असून पुढील तपास श्रीवर्धन पोलीस करत आहेत.
