कोलाड | विश्वास निकम
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील आंबेवाडी, कोलाड आणि वरसगाव येथील प्रलंबित प्रश्नांसाठी गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेले साखळी उपोषण अखेर शनिवारी (१० जानेवारी) स्थगित करण्यात आले. रोह्याचे तहसीलदार किशोर देशमुख आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा करून लेखी आश्वासन दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. मात्र, येत्या काही दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा तीव्र उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
नेमक्या मागण्या काय?
मुंबई-गोवा महामार्गावरील आंबेवाडी कोलाड-वरसगाव येथील व्हीयुपी (VUP) उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंना २०० मीटर अंतरावर अंडरपास बोगदे देणे, अर्धवट राहिलेल्या सर्विस रोडचे काम पूर्ण करणे आणि गटारांवरील झाकणे बसवणे या प्रमुख मागण्यांसाठी ५ जानेवारी २०२६ पासून आंबेवाडी बाजारपेठेत पंचक्रोशीतील नागरिकांनी साखळी उपोषण सुरू केले होते. पेण, नागोठणे, लोणेरे आणि महाडच्या धर्तीवर येथेही सुविधा मिळाव्यात, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

तहसीलदारांची मध्यस्थी आणि बैठक
शनिवारी सकाळी ११ वाजता राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी धिरज शहा, तहसीलदार किशोर देशमुख आणि कोलाडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांनी उपोषणस्थळी भेट देऊन चर्चा केली. तहसीलदार देशमुख यांनी यावेळी लेखी निवेदन सादर केले.
“फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा प्रशासन आणि महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन यावर सकारात्मक तोडगा काढला जाईल,” असे आश्वासन तहसीलदारांनी दिले.
१६ जानेवारीची डेडलाईन
यानंतर शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख अरुण चाळके यांच्या हस्ते सरबत घेऊन आंदोलकांनी उपोषण स्थगित केले. मात्र, मंत्रालयात १६ जानेवारी रोजी होणाऱ्या बैठकीत ठोस मार्ग निघाला नाही, तर पुन्हा साखळी उपोषण सुरू करून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी माजी सरपंच सुरेश महाबळे, चंद्रकांत लोखंडे, गणेश शिंदे, महेंद्र वाचकवडे, संजय कुर्ले, चंद्रकांत जाधव, समीर महाबळे, बबलू सय्यद, संजय लोटणकर, विजय बोरकर, मंगेश सरफळे, असिफ सय्यद, उदय खामकर, दगडू हाटकर यांच्यासह परिसरातील व्यापारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
