• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रोहा-कोलाड रस्त्यावर भंगार वाहनांचा विळखा; अपघाताची टांगती तलवार

ByEditor

Jan 10, 2026

बेशिस्त पार्किंगमुळे रहदारीला अडथळा; वाहतूक पोलिसांच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष

धाटाव । शशिकांत मोरे
रोहा-कोलाड रस्त्यालगत गेल्या अनेक महिन्यांपासून धूळ खात पडलेली आणि भंगार अवस्थेत असलेली वाहने आता वाहनचालक व पादचाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. या रस्त्यावर बेशिस्तपणे उभी करून ठेवलेली ही वाहने अपघाताला निमंत्रण देत असून, संबंधित वाहतूक पोलिसांनी यावर तातडीने कारवाई करून रस्ता मोकळा करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

वाहतुकीचा खोळंबा आणि वाढती अतिक्रमणे मुंबई-गोवा महामार्गाला जोडणारा हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. धाटाव औद्योगिक वसाहतीमुळे (MIDC) या रस्त्यावरून कामगार वर्ग, शाळकरी मुले आणि जड वाहनांची सतत वर्दळ असते. मात्र, रस्त्याच्या कडेला असलेल्या गॅरेजसमोर उभी असलेली भंगार वाहने, फळ-मासे विक्रेते यांची अतिक्रमणे यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. या अडथळ्यांमुळे पादचारी आणि सायकल चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

अंधाराचा फायदा, अपघाताची भीती रस्त्यावरील पथदिव्यांची अवस्था दयनीय असून ते अनेकदा बंद असतात. रात्रीच्या वेळी अंधार असल्यामुळे रस्त्यालगत उभी असलेली ही भंगार वाहने चालकांच्या नजरेस पडत नाहीत. यामुळे गंभीर अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यापूर्वीही या मार्गावर झालेल्या अपघातांत अनेकांना आपला जीव गमावावा लागला असून काहींना कायमचे अपंगत्व आले आहे.

पोलिस प्रशासनाकडे कारवाईची मागणी अनेक महिन्यांपासून ही वाहने एकाच जागी पडून आहेत, मात्र त्यांचे मालक याकडे दुर्लक्ष करत आहेत. “या वाहनांचा नक्की वाली कोण?” असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. बेशिस्तपणे वाहने उभी करणाऱ्या मालकांवर रोहा वाहतूक पोलिसांनी कठोर कारवाई करावी आणि ही भंगार वाहने रस्त्यावरून हटवून मार्ग मोकळा करावा, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिक व प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!